पदवीधरांच्या मतदार यादीत महिलांचा टक्का कमी
By Admin | Updated: May 14, 2014 00:09 IST2014-05-14T00:09:34+5:302014-05-14T00:09:34+5:30
प्रसिद्ध झालेल्या पदवीधर मतदारांच्या यादीत २ लाख ७७ हजार ७४ मतदार असले तरी त्यात महिलांचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज ...

पदवीधरांच्या मतदार यादीत महिलांचा टक्का कमी
नागपूर : प्रसिद्ध झालेल्या पदवीधर मतदारांच्या यादीत २ लाख ७७ हजार ७४ मतदार असले तरी त्यात महिलांचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी व्यक्त केली. सांख्यिकी विभागाकडे असलेली पदवीधर महिलांची संख्या आणि मतदार यादीतील महिलांचे स्थान यात तफावत आहे. ती दूर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. एकूण पदवीधर महिलांपैकी नागपूरमध्ये ३६ टक्के, वर्धा ३८ टक्के, चंद्रपूर २४ टक्के, भंडारा २४ टक्के, गोंदिया ३९ टक्के आणि गडचिरोलीत फक्त २१ टक्के महिलांनीच नोंदणी केली आहे. ही संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन आयुक्तांनी राजकीय पक्षांना केले आहे. विशेषत: गृहिणी त्यांचे नाव नोंदविण्यासाठी उत्सुक नसतात. विवाहानंतर नाव बदलल्यानेही अनेकांची अडचण होते. विवाहित महिलांनी नाव नोंदविताना शपथपत्र देणे गरजेचे आहे. यासाठी राजकीय पक्षांनी जनजागृती करून जास्तीतजास्त महिला पदवीधरांची नोंदणी करून घ्यावी, असे आयुक्त म्हणाले. नाव नोंदविण्यासाठी हे करावे लागेल ग्रामीण भागात तहसील व उपविभागीय कार्यालय व शहरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयातून अर्ज क्र. १८ घेऊन तो भरणे, सोबत पदवी किंवा पदविकेच्या दोन छायांकित प्रती, निवासाचा पत्ता, दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे जोडून ती उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी. विवाहानंतर महिलांचे नाव बदलले असेल तर त्यांना त्यासाठी शपथपत्र सादर करावे लागेल. नोंदणी अर्ज पुरेसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. मतदारांनाच करावी लागणार खात्री मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी ही मतदारांचीच आहे. मतदार पदवीधर असल्याने त्यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन याबाबत खात्री करून घ्यावी, यासाठी वेगळी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार नाही. राजकीय पक्षांनी यासाठी काही प्रयत्न करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. (प्रतिनिधी)