टॉपर्सचा टक्का घसरला
By Admin | Updated: May 22, 2016 02:43 IST2016-05-22T02:43:46+5:302016-05-22T02:43:46+5:30
‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

टॉपर्सचा टक्का घसरला
नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत विज्ञान, वाणिज्य व मानव्य शास्त्र या तिन्ही शाखांमध्ये टॉपर्सचा टक्का घसरला आहे. गणित व इंग्रजीमुळे ही अडचण झाल्याचे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विज्ञान शाखेची टक्केवारी दोन टक्क्यांनी, वाणिज्य व मानव्यशास्त्र शाखेची टक्केवारी एका टक्क्यांनी घसरली आहे. विज्ञानात सलग दोन वर्षापासून तिन्ही शाखेत मुलीचाच वरचष्मा असायचा.
यंदा वाणिज्य शाखेत एस. अरविंदने मुलींना मागे टाकले. २०१५ मध्ये सीबीएसईच्या निकालात विज्ञान शाखेचा टॉपरने ९७.४ टक्के, वाणिज्य शाखेत ९७.४ व मानव्यशास्त्र शाखेत ९६.२ टक्के गुण मिळविले होते. यावर्षी विज्ञान शाखेमध्ये टॉपराला ९५.८, वाणिज्य मध्ये ९६.८ व मानव्यशास्त्र शाखेत ९५.४ टक्के गुण मिळाले आहे. शहरातील २० शाळांमधून सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जवळपास १५० हून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. यात विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त असल्याची माहिती शाळांतर्फे देण्यात आली आहे. सामान्यत: विज्ञान विषयात जास्त गुण मिळतात, असा समज आहे. परंतु मागील तीन वर्षांप्रमाणेच यंदादेखील निकालांत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून शहरातून अव्वल स्थान पटकाविले. ‘मेट्रो’ शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वाणिज्य शाखेला मागणी वाढत असून अनेक गुणवंत विद्यार्थी इकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात वाणिज्य शाखेवर विद्यार्थ्यांचा जास्त भर नक्कीच दिसून येईल, असा विश्वास अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविला.