गावावरून विमान गेले तर लोक घाबरून पळायचे
By Admin | Updated: August 6, 2015 02:45 IST2015-08-06T02:45:53+5:302015-08-06T02:45:53+5:30
द्वितीय महायुद्धात अमेरिकेने पहिल्यांदाच अणुुबॉम्बचा वापर केला. जपानच्या हिरोशिमा या शहरावर ६ आॅगस्ट १९४५ मध्ये अणुबॉम्ब टाकण्यात आला.

गावावरून विमान गेले तर लोक घाबरून पळायचे
हिरोशिमादिन : भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी जागवल्या आठवणी
आनंद डेकाटे नागपूर
द्वितीय महायुद्धात अमेरिकेने पहिल्यांदाच अणुुबॉम्बचा वापर केला. जपानच्या हिरोशिमा या शहरावर ६ आॅगस्ट १९४५ मध्ये अणुबॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी नागासाकी या शहरावर दुसरा अणुुबॉम्ब टाकण्यात आला. या दोन्ही हल्ल्यात हजारो सैनिक आणि लाखो निरपराध नागरिक मारल्या गेले. अनेक वर्षे या हल्ल्याचे परिणाम कायम होते. या हल्ल्यात बेचिराख झालेले जपान पुन्हा सावरले. केवळ सावरलेच नाही तर जगातील विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसले. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे मूळचे जपानचेच. इतिहासात पहिल्यांदा ज्या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला त्या हिरोशिमा शहराला लागून त्यांचे निमी (ओकायामा) हे गाव आहे. हिरोशिमा दिनाच्या निमित्ताने भदंत ससाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अणुबॉम्बच्या हल्ल्यावेळी आपल्या गावात अनुभवलेल्या आठवणींना उजाळा दिला.
नागपूर : अमेरिकेने हिरोशिमा शहरावर अणुुबॉम्ब टाकला आणि त्यात लाखो लोक मारल्या गेल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. सर्व वरिष्ठ मंडळी एकत्र आली. एकच चर्चा सुरू होती. ही चर्चा संपण्यापूर्वीच तीन दिवसांनी पुन्हा नागासाकी शहरावर दुसरा अणुुबॉम्ब टाकण्यात आला. त्यामुळे जपानच नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले होते. आमचे गाव हिरोशिमा शहराजवळ होते. आमच्या गावाला अणुबॉम्बच्या हल्ल्याची फारशी झळ पोहोचली नाही. परंतु त्या घटनेनंतर सर्वत्र भीतीयुक्त दहशत मात्र पसरली होती. गावावरून एखादे विमानही गेले तरी लोक घाबरून घरात पळायचे, आम्ही तेव्हा खूप लहान होतो. फारसे कळत नव्हते. मात्र त्या अणुुबॉम्बच्या हल्ल्याची जी दहशत लोकांमध्ये होती, ती मात्र आजही स्मरणात आहे.
भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी सांगितलेला हा अनुभव. भंते ससाई हे मूळचे जपानचे. इतिहासात पहिल्यांदा अमेरिकेने जपानमध्येच अणुुबॉम्ब टाकला. ६ आॅगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुुबॉम्ब टाकण्यात आला. त्यात २० हजार सैनिकांसह दीड लाखावर निरपराध नागरिक मारल्या गेले. त्यानंतर तीन दिवसाने पुन्हा नागासाकी या शहरावर दुसरा अणुुबॉम्ब अमेरिकेने टाकला. यातही ३९ हजार सैनिकांसह लाखो नागरिक मारल्या गेले. या दोन्ही हल्ल्याने केवळ जपानच नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले होते.अमेरिकेने पहिल्यांदा ज्या शहरावर अणुबॉम्ब टाकला त्या हिरोशिमा शहराला लागून असलेल्या ओकाहामा शहरातील निमी हे भदंत ससाई यांचे गाव होय.
त्या वेळच्या आठवणींना उजाळा देतांना भदंत ससाई यांनी सांगितले की, द्वितीय महायुद्धाचा तो काळ होता. मी १४-१५ वर्षाचा होतो. युद्धाचा तो काळ होता, हे गावातील लोकांच्या चर्चेवरून लक्षात आले होते. हिरोशिमा आणि नागासकी शहरावरील अणुुबॉम्बच्या हल्ल्यात लाखो लोकं मारल्या गेले. माझे गाव हिरोशिमाला लागून होते. आम्हाला त्या हल्ल्याची थेट झळ पोहोचली नाही. मात्र त्या हल्ल्यात मृत्यूचा सडा पडल्याचे गावातील लोक ंसांगायचे.
गावातील जी मंडळी शहरात जाऊन येत होती ती तिकडच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीयुक्त दहशत पसरली होती. गावावरून एखादे विमानही गेले तरी लोकं घाबरायचे, घरांमध्ये पाळायचे. पुढील अनेक वर्षे गावात ती दहशत कायम होती. (प्रतिनिधी)