अलर्ट करूनही लोक ऐकत नाही, त्यामुळे अशा घटना घडतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST2021-07-19T04:07:05+5:302021-07-19T04:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये दरड कोसळून अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत ...

अलर्ट करूनही लोक ऐकत नाही, त्यामुळे अशा घटना घडतात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये दरड कोसळून अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत सगळीकडूनच हळहळ व्यक्त होत असताना राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र याचे खापर नागरिकांवरच फोडले. वारंवर अलर्ट करूनदेखील लोक ऐकत नाहीत. त्यामुळे अशा घटना घडतात, असे वक्तव्य त्यांनी रविवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान केले.
मुंबईत लोकांची संख्या वाढत असून डोंगरावरदेखील लोक घरे, झोपड्या बांधत आहेत. पावसामुळे धोका होऊ शकतो याचा इशारा वारंवार देण्यात आला होता. मात्र लोकांनी ऐकले नाही. काल पहाटेपासून मुंबईत ३४५ मिमी पावसाची नोंद झाली. इतक्या पावसात अशा घटना होणे हीदेखील सामान्य बाब असल्याचेदेखील वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत घोषित केली आहे. तातडीची मदत म्हणून १० हजारांची मदत आणि पंचनामे केल्यानंतर घराच्या डागडुजीसाठीही मदत करण्यात येणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.