नग्न चित्र बघून लोक का संतापतात?
By Admin | Updated: March 3, 2017 03:03 IST2017-03-03T03:03:13+5:302017-03-03T03:03:13+5:30
आपल्या देशात कलेची कदरच नाही. येथे अभिव्यक्तीच्या माध्यमांवर रोज शेकडो

नग्न चित्र बघून लोक का संतापतात?
सुभाष अवचट : राम शेवाळकरांच्या जयंतीदिनी रंगली प्रकट मुलाखत
नागपूर : आपल्या देशात कलेची कदरच नाही. येथे अभिव्यक्तीच्या माध्यमांवर रोज शेकडो तथाकथित नैतिक बंधने लादली जातात. मला एखादे नग्न चित्र काढावे वाटले तर ते मी काढू शकत नाही. कारण, लगेच लोकांच्या भावना दुखावतात, हजारोंचे मोर्चे माझ्या घरावर चालून येतात. पोलिसांचा हस्तक्षेप वाढतो. कलेला कलेच्या दृष्टीने का बघितले जात नाही, लोक असे का संतापतात, असा उद्विग्न सवाल जागतिक कीर्तीचे चित्रकार सुभाष अवचट यांनी उपस्थित केला.
राम उपाख्य नानासाहेब शेवाळकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शेवाळकरांच्या निवासस्थानी आयोजित ‘गप्पा-सुभाष अवचटांशी...’ या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. लोकमतच्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी सुभाष अवचट यांना त्यांच्या या चित्रप्रवासाबाबत बोलते केले. या क्षेत्रातील अनेक चांगल्या गोष्टी सांगतानाच त्यांनी चित्रकला क्षेत्रातील राजकारण आणि कलावंतांच्या उपेक्षेवरही नेमके बोट ठेवले. सुभाष अवचट पुढे म्हणाले, युरोपात आजही विद्यार्थ्याला बाराखडी शिकवताना पी फॉर पॅरोट नाही तर पी फॉर पिकासो शिकविले जाते. इतकी त्या देशात कलेप्रति समर्पितता आहे. आपल्याकडे एखादा एम. एफ. हुसेन काही नवीन प्रयोग करतो तर लगेच त्याचे पुतळे जाळले जातात, राजा रवी वर्मासारख्या चित्रकारावर न्यायालयात खटले दाखल होतात.
हे चित्र बदलले पाहिजे, अशी अपेक्षा अवचटांनी व्यक्त केली. आपल्यावर चित्रकलेचे संस्कार कसे झाले हे सांगताना त्यांनी श्रोत्यांना थेट बालपणातील त्यांच्या ओतूर या त्यांच्या मूळ गावी नेले. माझ्या वाड्यात काढलेल्या रांगोळ्यांनी मला पहिल्यांदा रंगांची ओळख करून दिली.
पुढे गावातील नदी, निसर्ग हे माझ्या चित्रांचे विषय झाले. त्याही पुढे साधना प्रेसमध्ये काम करताना मला जीवनाची दुसरी कष्टदायक बाजू दिसली आणि माझ्या चित्रकारितेचा पिंड बदलला. ग्रेस, अरुण साधू, नामदेव ढसाळ यांच्यासारख्या लेखकांच्या पुस्तकाचे कव्हर मी काढू शकलो कारण त्यांच्यातील लेखकाला मला आंतर्बाह्य वाचता आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा, डॉ. गिरीश गांधी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी शेवाळकरांच्या निवासस्थानी भेट देऊन नानासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. (प्रतिनिधी)
डॉ. भाऊ झिटे यांचा गडकरींच्या हस्ते गौरव
नानासाहेबांच्या जन्मदिनी आयोजित या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आंतरभारती आश्रम, दाभा येथे रुग्णसेवेचा आदर्श उभा करणारे डॉ. भाऊ झिटे यांचा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘राम शेवाळकर आधारवड पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. एक लक्ष रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मंचावर माजी मंत्री नानाभाऊ एम्बडवार उपस्थित होते. एम्बडवार यांनी आपल्या भाषणात डॉ. भाऊ झिटे यांच्या सेवाकार्याचा आढावा घेतला व त्यांना हा पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे सार्थक झाले, असे गौरवोद्गारही काढले. डॉ. भाऊ झिटे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, समाजातील प्रत्येकाने सेवेचा वसा स्वीकारल्याशिवाय मानव दु:खमुक्त होणार नाही. आज देशात जो आतंकवाद दिसतोय तो खरं म्हणजे असंतोष आहे. अशा असंतोषाला खतपाणी घातले जाईल असे कुठलेही कार्य करू नका, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन मधुकर सरपटवार यांनी केले.