- दयानंद पाईकराव नागपूर - उमरेड-पवनी-कन्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध एफ-२ वाघिणीला तिच्या बछड्यांसह समोरुन व मागून घेरल्याच्या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली होती. या घटनेची गांभीर्याने नोंद घेत वन विभागाने जंगल सफारीत जिप्सी चालक, गाईड व पर्यटकांना मोबाईलचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. तसेच घटनेत सामील जिप्सी चालकांना २५ हजार तर गाईडला १ हजारांचा दंड ठोठावला आहे. घटनेच्या वेळी जिप्सीत बसलेल्या सर्वच पर्यटकांना भविष्यात पेंचमध्ये पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाने धडाक्यात केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
३१ डिसेंबर २०२४ रोजी उमरेड-पवनी-क-हांडला अभयारण्यात जिप्सी चालकांनी एफ-२ वाघिणीला तिच्या बछड्यांसह समोरुन व मागून घेरले होते. या घटनेचा फोटो व्हायरल झाला आणि खळबळ उडाली होती. वाघिणीला घेरणे हा भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने ४ जिप्सी चालक व ४ गाईडला ७ दिवसांसाठी निलंबीत केले होते. तर जिप्सी चालकांना २ हजार ५०० रुपये व गाईडला ४५० रुपये दंड आकारला होता. या प्रकरणी वन विभागाने या शिक्षेत वाढ केली असून ४ जिप्सी चालक व ४ गाईडचे ३ महिन्यांसाठी निलंबन केले आहे. तर जिप्सी चालकांना २५ हजार व गाईडला १ हजार रुपये दंड ठोठावून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व उपाययोजना सुचविण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभु नाथ शुक्ला यांनी जारी केले आहे.
एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मोबाईलबंदीपेंचमध्ये जंगल सफारी दरम्यान जिप्सी चालक, पर्यटक व गाईड सर्वांकडे मोबाईल असतात. एका जिप्सी चालकाला वाघ किंवा बिबट दिसल्यास तो इतरांना मोबाईलवरून कॉल करून तेथे बोलावतो. त्यामुळे एकाच ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिनस्त असलेल्या व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य क्षेत्रात पर्यटक, गाईड व जिप्सी चालकांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ११ जानेवारी २०२५ पासून ही मोबाईल बंदी अंमलात येणार आहे. 'त्या' पर्यटकांना पेंचमध्ये बंदीउमरेड-पवनी-कहांडला अभयारण्यातील घटनेत ४ जिप्सीमध्ये असलेल्या २४ पर्यटकांना पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य क्षेत्रात आजीवन बंदी घालण्यात आली आहे. तसेच सफारी मार्गावर अशा घटना टाळण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.