‘इंडेन’च्या ‘डीलर्स’ला साडेतीन लाखांचा दंड
By Admin | Updated: July 23, 2015 02:58 IST2015-07-23T02:58:45+5:302015-07-23T02:58:45+5:30
‘इंडियन आॅईल कॉपोॅरेशन लिमिटेड’अंतर्गत येणाऱ्या ‘इंडेन’ला ग्राहकांना वेळेवर सिलेंडर्सची ‘डिलीव्हरी’ न देणे महागात पडले आहे.

‘इंडेन’च्या ‘डीलर्स’ला साडेतीन लाखांचा दंड
ग्राहकांना वेळेवर सिलेंडरची ‘डिलीव्हरी’ नाही : ३५४ ग्राहकांच्या तक्रारी
नागपूर : ‘इंडियन आॅईल कॉपोॅरेशन लिमिटेड’अंतर्गत येणाऱ्या ‘इंडेन’ला ग्राहकांना वेळेवर सिलेंडर्सची ‘डिलीव्हरी’ न देणे महागात पडले आहे.
‘इंडेन’च्या शहरातील ३ ‘एजन्सी’ला कंपनीने सुमारे साडेतीन लाखांचा दंड ठोठावला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात ‘इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लिमिटेड’कडे विचारणा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार विविध ‘एजन्सी’कडून योग्य सेवा न मिळाल्याच्या कंपनीला ३५४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सर्वात जास्त तक्रारी विमल गॅस एजन्सीच्या विरुद्ध आहेत. शिवाया सिलेंडरची ‘डिलिव्हरी’ उशिरा मिळण्याबाबतदेखील तक्रारी होत्या. याची दखल घेत कंपनीने भेंडे गॅस एजन्सी, धुर्वे गॅस एजन्सी व श्री गॅन्स अॅन्ड डोमेस्टिक अप्लायन्सेस या तीन ‘एजन्सी’वर कारवाई केली आहे.या तीन ‘एजन्सी’कडून एकूण ३ लाख ५३ हजार ४२३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १५ जूनपर्यंत ‘इंडेन’चे नागपूर जिल्ह्यात २ लाख ९३ हजार ६७० ग्राहक आहेत. १ एप्रिल २०१३ ते १५ जून २०१५ या कालावधीत ३७ हजार ६४७ ग्राहकांची भर पडली आहे. (प्रतिनिधी)