वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारावर दंडाची आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:32+5:302021-04-11T04:07:32+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागांतर्गत कंत्राटदाराकडून करवून घेण्यात येत असलेली कामे कंत्राटदाराने विहित मुदतीत न केल्याने त्याच्यावर प्रतिदिवस ...

वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारावर दंडाची आकारणी
नागपूर : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागांतर्गत कंत्राटदाराकडून करवून घेण्यात येत असलेली कामे कंत्राटदाराने विहित मुदतीत न केल्याने त्याच्यावर प्रतिदिवस दंडाची आकारणीला सुरुवात केली आहे. कामाची स्थिती अशीच राहिल्यास कामे काढून घेण्याचा इशाराही कंत्राटदाराला दिला आहे.
लघुसिंचन विभागाने नरखेड तालुक्यातील खराळा, पिपळधरा, रिधोरा आणि तेलकामठी येथील कामे नानक कन्स्ट्रक्शनला निविदेनुसार वाटप केले होते. ही कामे ३१ मार्चपूर्वी करायची होती. परंतु, विविध कारणे सांगत कामे करण्याचे टाळण्यात आले़ याबाबत कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी कामे वेळेत करण्यासंदर्भात सूचनाही केल्या होत्या. तरीही कंत्राटदाराने कामे केली नाही़ शेवटी बांधकाम संहितेनुसार दंडाची आकारणी करण्यात आली़ खराळा येथील तलाव दुरुस्तीचे काम ३१.८८ टक्के बिलोने घेण्यात आले़ ३० लाख रुपये किमतीच्या कामाची वर्कऑर्डर ही ३ जुलै २०२० ला काढण्यात आली़ सहा महिन्यांच्या मुदतीत हे काम करावयाचे होते़ ते होऊ न शकल्याने प्रतिदिवस ३८० रुपये दंड आकारण्यात आला़ पिपळधरा पाझर तलाव दुरुस्ती कामाची हीच स्थिती आहे़ या कामावर १२० रुपये प्रतिदिवस दंड ठोठाविण्यात आला़, तर रिधोरा पाझर तलावाचे काम ३१ लाख ५१ हजार ५८५ रुपये किमतीचे आहे़ ते सुद्धा ३१.८८ टक्के बिलोने संबंधित कंत्राटदाराने घेतले़ ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण न केल्याने प्रतिदिवस ३६५ रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली़ दंडाची रक्कम संबंधित कंत्राटदाराने देय केली नसल्याची माहिती आहे़ कामात अशीच दिरंगाई राहिल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची तंबी देण्यात आली आहे़