सुटीच्या दिवशीही वीज ग्राहकांकडून साडेसात कोटींचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:17+5:302021-03-15T04:07:17+5:30
नागपूर : थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरणकडून मागील तीन दिवसात आक्रमक मोहीम राबविण्यात आल्याने रविवारी सार्वत्रिक सुटी असूनही सुमारे ...

सुटीच्या दिवशीही वीज ग्राहकांकडून साडेसात कोटींचा भरणा
नागपूर : थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरणकडून मागील तीन दिवसात आक्रमक मोहीम राबविण्यात आल्याने रविवारी सार्वत्रिक सुटी असूनही सुमारे चार हजार वीज ग्राहकांनी १.५ कोटी रुपयांचा भरणा महावितरणच्या तिजोरीत केला. मागील दोन दिवसात २५ हजार ५३८ वीज ग्राहकांनी ७ कोटी १२ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
दरम्यान, रविवारी सार्वत्रिक सुटी असूनही नागपूर शहरातील महावितरणकडून थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात जोरदार मोहीम राबविण्यात आली. मागील तीन दिवसात शहरातील दोन हजार थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वीज ग्राहकांना आपल्या देयकाची रक्कम भरणे सोयीचे जावे यासाठी शहरातील १२९ वीज बिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू ठेवले आहे. ३१ मार्चपर्यंत ही केंद्र सुरू राहणार आहेत.
बॉक्स
मीटर वाचन सुरू राहणार
मागील वर्षी लाॅकडाऊन लागल्यावर महावितरण प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणून मीटर वाचन आणि वीज देयक वाटप बंद केले होते. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात येत्या १५ ते २१ मार्च काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लाॅकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात महावितरणकडून महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांना लेखी विचारले. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. तसेच मागील अनुभव लक्षात घेता यंदा ग्राहकांच्या दारात जाऊन मीटर वाचन करणे आणि देयक वाटप करणे या कामांना परवानगी देण्यात आली आहे. तरी वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.