संघकार्याचा विस्तार हीच पात्रीकर मास्तरांना श्रद्धांजली
By Admin | Updated: December 18, 2015 03:35 IST2015-12-18T03:35:46+5:302015-12-18T03:35:46+5:30
पात्रीकर मास्तरांनी विपरीत परिस्थितीत मोठ्या निष्ठेने संघाचे कार्य केले. समोर आलेल्या प्रत्येक अडचणींचा सामना करीत हे कार्य त्यांनी पुढे नेले. त्यांचे कार्य जगासमोर आले नाही,

संघकार्याचा विस्तार हीच पात्रीकर मास्तरांना श्रद्धांजली
मोहन भागवत : पात्रीकर मास्तर जन्मशताब्दी सोहळ्याचे समापन
नागपूर : पात्रीकर मास्तरांनी विपरीत परिस्थितीत मोठ्या निष्ठेने संघाचे कार्य केले. समोर आलेल्या प्रत्येक अडचणींचा सामना करीत हे कार्य त्यांनी पुढे नेले. त्यांचे कार्य जगासमोर आले नाही, मात्र संघाचा आशय लोकांच्या हृदयात पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले. देशसेवा म्हणून संघविस्ताराचे कार्य पुढे वाढविणे ही आपली जबाबदारी असून पात्रीकर मास्तरांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
पात्रीकर मास्तर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पात्रीकर मास्तर जन्मशताब्दी सोहळ्याच्या समापन कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, समितीय अध्यक्ष वसंत देवपुजारी, सचिव दत्ताजी चिव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले, संघात मनुष्य घडविण्याची परंपरा अखंड सुरू आहे. ती इतरांना दिसत नाही. मात्र संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला या अनुभवाचे धन मिळाले आहे. संघाची व्यक्तिनिर्मितीची परंपरा जोपासणाऱ्यांमध्ये पात्रीकर मास्तरांचे मोलाचे योगदान आहे. संघाचे कार्य हे ईश्वरीय काम आहे, या निष्ठेने आणि आत्मविश्वासाने त्यांनी हे कार्य केले. आज संघाचा प्रभाव आहे. मात्र त्याकाळी अशी परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीत आपली संघनिष्ठा कायम ठेवून सेवेचे कार्य करणारे पात्रीकर मास्तर पुढच्या पिढीला संस्कारक्षम ठेवा आहेत, असे ते म्हणाले. जे विचार आपण ऐकतो, तसे प्रत्यक्ष जीवन जगणारे संघ स्वयंसेवक आम्ही पाहिले असून पात्रीकर मास्तर त्यातीलच एक होते. भारत निर्माणाचे जे स्वप्न महापुरुषांनी पाहिले, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर असून या कार्याचा विस्तार करणे हेच ध्येय आपण ठेवावे, असे आवाहन डॉ. भागवत यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना राजदत्त यांनी पात्रीकर मास्तर आदर्श स्वयंसेवक आणि निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांच्यासारख्यांमुळेच संघ वाढल्याचे मत व्यक्त केले. संघ शाखेच्या एक तासात ते कठोर शिक्षक असायचे, मात्र हा तास संपला की त्यांच्यातला मृदुपणा हृदय भाळणारा असायचा. त्यांच्यासोबत मिळालेले क्षण अविस्मरणीय असल्याचे सांगत बालस्वयंसेवकापर्यंत त्यांचे चित्रमन पोहचले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या वेळी पात्रीकर मास्तरांचा जीवनदर्शन घडविणाऱ्या स्मरणिकेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले; सोबतच १४ स्वयंसेवक शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. दिलीप चंद्रायण यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)