मेडिक्लेमचे पाच लाख रुपये सहा टक्के व्याजासह अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:26 IST2020-12-11T04:26:43+5:302020-12-11T04:26:43+5:30
नागपूर : तीन तक्रारकर्त्या ग्राहकांना मेडिक्लेमचे पाच लाख रुपये सहा टक्के व्याजाने अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक ...

मेडिक्लेमचे पाच लाख रुपये सहा टक्के व्याजासह अदा करा
नागपूर : तीन तक्रारकर्त्या ग्राहकांना मेडिक्लेमचे पाच लाख रुपये सहा टक्के व्याजाने अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला दिला. व्याज २९ जानेवारी २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, तक्रारकर्त्या ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार अशी एकूण १५ हजार रुपये भरपाईही मंजूर करण्यात आली. ही रक्कमदेखील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशननेच द्यायची आहे.
मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी संबंधित तक्रारीवर निर्णय दिला. या निर्णयाचे पालन करण्यासाठी कॉर्पोरेशनला एक महिन्याचा वेळ देण्यात आला. शालिनी मेडपिलवार, सारिका बंडावार व श्रीकांत मेडपिलवार अशी तक्रारकर्त्यांची नावे असून ते मयत उल्हास मेडपिलवार यांचे वारसदार आहेत. उल्हास मेडपिलवार यांनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून १९ डिसेंबर २०११ ते १९ डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी पाच लाख रुपयाची मेडिक्लेम पॉलिसी काढली होती. त्यानंतर त्यांचा लिव्हरच्या आजारामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. करिता, वारसदारांनी कॉर्पोरेशनकडे मेडिक्लेम सादर केला. परंतु, कॉर्पोरेशनने त्यांना मेडिक्लेमची रक्कम अदा केली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती.