नागपूरच्या कोरोना संकटासाठी तत्काळ १०० कोटी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:28+5:302021-04-17T04:07:28+5:30
नागपूर : उपराजधानीच्या नागपूर शहरात कोरोनाने कहर माजविला आहे. दररोज ७ हजाराच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह येत आहे. मृतांच्या आकड्याने ...

नागपूरच्या कोरोना संकटासाठी तत्काळ १०० कोटी द्या
नागपूर : उपराजधानीच्या नागपूर शहरात कोरोनाने कहर माजविला आहे. दररोज ७ हजाराच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह येत आहे. मृतांच्या आकड्याने पंचाहत्तरी गाठली आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. शेकडो नागरिकांना उपचार मिळत नसल्याने घरीच मृत्यू होत आहेत. शहरात कोरोनाने विदारक परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे शासनाने या संकटकाळात नागपूर जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची तत्काळ तरतूद करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की शहरात १ हजार बेडचे अद्ययावत रुग्णालय तयार करावे. महापालिका ही परिस्थिती हाताळण्यात सपेशल अपयशी ठरली आहे. महापालिकेची आर्थिक स्थितीही कमजोर झाली आहे. अशा परिस्थितीत पुणे आणि मुंबई शहराप्रमाणे नागपूरलाही तातडीने आर्थिक मदत करावी. नागपूरसह विदर्भात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. रेमडेसिविर इंजेक्शन, कोरोना प्रतिबंधात्मक लसींचादेखील तुटवडा आहे. त्यांचाही तत्काळ पुरवठा करणे गरजेचे झाले आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये १०० च्यावर वेटिंग आहे. शेकडोंचा मृत्यू उपचाराअभावी रुग्णालयाच्या परिसरातच होत आहे. अशा गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची विनंती ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली.