संपत्ती कर भरा, पाच टक्के सूट मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:46+5:302021-07-17T04:07:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना काळात आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या शहरातील नागरिकांना मनपाने पुन्हा एकदा दिलासा देण्याचा ...

Pay property tax, get five percent discount | संपत्ती कर भरा, पाच टक्के सूट मिळवा

संपत्ती कर भरा, पाच टक्के सूट मिळवा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना काळात आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या शहरातील नागरिकांना मनपाने पुन्हा एकदा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२१ यादरम्यान संपत्ती कर भरणाऱ्यांना करात ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. मनपाच्या पुढील सर्वसाधारण सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. विशेष म्हणजे मे महिन्यात पार पडलेल्या सभेत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला होता; परंतु सभेच्या मिनिट्समध्ये याचा उल्लेख झाला नसल्याने त्यावर अंमल होऊ शकला नाही.

संपत्ती करात १० टक्के सूट देण्याची योजना गेल्या १४ जून ते ३० जूनदरम्यान लागू करण्यात आली होती. ४५ हजार संपत्तीधारकांनी या सवलतीचा लाभ घेतला. ३३ कोटी रुपये जमा केले. तसे ३१ जूनपर्यंत एकूण ७१ हजार लोकांकडून ४४ कोटी रुपये संपत्ती कर जमा झाला आहे. १ एप्रिल ते १६ जुलैपर्यंत नागपूर शहरात ८२,३८३ संपत्तीधारकांनी ५३ कोटी रुपये जमा केले. गेल्या वर्षी याच कालावधीत ३४ कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, लोक संपत्ती कर भरण्यास इच्छुक आहेत. नागपूर शहरात ६.५० लाखांच्या जवळपास संपत्तीधारक आहेत; परंतु नियमित कर न भरल्यामुळे करंट बिल व थकबाकी ९०० कोटींच्या जवळपास पोहोचली आहे.

- तीन वर्षांचा दंड माफ करण्यावर निर्णय नाही

मागच्या सर्वसाधारण सभेत महापौर दयाशंकर तिवारी यांनी ‘कोरोना काळात लोक आर्थिक अडचणीत असल्याने २०१९ ते २०२१ या कालावधीतील संपत्ती कराचा दंड माफ करण्याची घोषणा केली होती. एक महिन्यानंतरही या घोषणेवर निर्णय झालेला नाही. दंड माफ करण्याचा अधिकार मनपा आयुक्तांकडे आहे. आयुक्तांनी कर भरणाऱ्यांना डिसेंबरपर्यंत ५ टक्के सूट देण्याच्या घोषणेला मंजुरी दिली आहे. अशा परिस्थितीत तीन वर्षांचा दंड माफ करण्याची योजना थंडबस्त्यात आहे.

Web Title: Pay property tax, get five percent discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.