आधी फी भरा, नंतर ऑनलाइन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST2021-07-07T04:09:52+5:302021-07-07T04:09:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : काेराेना संक्रमणामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ...

आधी फी भरा, नंतर ऑनलाइन शिक्षण
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : काेराेना संक्रमणामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑनलाइन शिक्षणाची साेय करण्यात आली आहे. त्यातच पालकांनी त्यांच्या साेयीनुसार फीचे काही हप्ते भरले. मात्र, कळमेश्वर शहरातील एका खासगी शाळेत पालकांना पूर्ण फी भरण्याची सूचना करण्यात आली असून, फी न भरल्यास मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार नाही, अशाही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही समस्या साेडविण्याची मागणी पालकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
काहींची मुले इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये शिकतात. काेराेना संक्रमणामुळे शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. त्यासाठी पालकांना महागडा माेबाइल फाेनही खरेदी करून त्याच्या रिचार्जवर खर्च करावा लागला. याच काळात लाॅकडाऊनमुळे उद्याेगधंदेही ठप्प झाल्याने बहुतेक पालकांचे उत्पन्न कमी झाले. याच काळात ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शाळेकडून लिंक पाठविणे व मुलांना शिकविण्याचे काम सुरू हाेते. आर्थिक अडचणींमुळे काही पालकांनी थाेडीफार फी भरली तर काहींनी पूर्ण फी भरली.
नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, शाळांनी ज्या पालकांकडे मागच्या सत्रातील फी थकीत आहे, त्यांना फीची उर्वरित रक्कम मागायला सुरुवात केली. जाेपर्यंत ती फी पूर्णपणे भरली जात नाही, ताेपर्यंत पाल्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार नाही, अशी अप्रत्यक्ष सूचनाही खासगी शाळांनी पालकांना दिली आहे. यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना लिंक पाठविणेही बंद केले आहे.
या प्रकारात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत असल्याने शासन व प्रशासनाने ही समस्या साेडवावी. त्यासाठी खासगी शाळांना शासकीय नियमानुसार फीची आकारणी करून ती वसूल करण्याच्या सूचना द्या तसेच फी टप्प्याटप्प्याने भरण्याची पालकांना मुभा द्यावी, अशी मागणीही पालकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत ईखार, गजानन झाडे, ज्ञानेश्वर गुरव, सुनील मानकर, दिनेश गोतमारे, वीरेंद्र गोतमारे, मधुकर बागडे यांच्यासह पालकांचा समावेश हाेता.
...
सरकारी नियमाने फी घ्या
लाॅकडाऊनमुळे पालकांनाही आर्थिक अडचणींना सामाेरे जावे लागत आहेत. त्यांना इच्छा असूनही शाळेची पूर्ण फी नियाेजित वेळेत भरणे शक्य हाेत नाही. यावर पर्याय म्हणून खासगी शाळांनी शासकीय नियमानुसार फीची आकारणी करावी. त्या फीचे हप्ते तयार करून ते टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे. काही पालकांनी खासगी शाळांना त्यांच्या पाल्यांच्या टीसी मागितल्या आहेत. त्यावर शाळांनी आधी मागील सत्रातील फी भरा व नंतर टीसी न्या, असे धाेरण अवलंबले आहे, अशी माहिती पालकांनी दिली.