आधी बिल भरा, नंतर ट्रान्सफार्मर दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:50+5:302021-07-18T04:07:50+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वायगाव (ता. माैदा) शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा १८ दिवसापासून बंद आहे. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर ...

आधी बिल भरा, नंतर ट्रान्सफार्मर दुरुस्ती
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : वायगाव (ता. माैदा) शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा १८ दिवसापासून बंद आहे. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर दुरुस्तीची मागणी करताच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आधी विजेची बिले भरा, नंतर ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा सूचना केल्या आहेत. प्रशासनाच्या या आडमुठ्या धाेरणामुळे वायगाव शिवारातील धानाचे पऱ्हे व मिरचीचे पीक पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे.
वायगाव परिसरात धान व मिरचीचे पीक माेठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली असून, अनेकांचे पऱ्हे राेवणीयाेग्य झाले आहे. पावसाने दडी मारल्याने राेवणी थांबविण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या भागात कालव्याची साेय नसल्याने शेतकरी विहिरी व इलेक्ट्रिक माेटरपंपद्वारे ओलित करतात. त्यातच १८ दिवसापूर्वी या शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
ट्रान्सफार्मर दुरुस्त करा अथवा बदलवून देण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीचे अराेली (ता. माैदा) येथील कनिष्ठ अभियंता चाैरे यांना अनेकदा निवेदने दिली. त्यावर जाेपर्यंत कृषिपंपांच्या विजेची बिले भरली जाणार नाही, ताेपर्यंत ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना कनिष्ठ अभियंता चाैरे यांनी दिल्याची माहिती शेतकऱ्यांसह महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
पाण्याअभावी मिरचीचे पीक व पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर असून, यात आपले दुहेरी नुकसान हाेत आहे. शासनाने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना नवीन ट्रान्सफार्मर लावण्याचे आदेश द्यावे, अशी मागगणी वायगाव येथील नेहरू राखडे, राजू बागडे, अनिल हारोडे, समीर डहारे, हिरालाल राखडे, राहुल गायधने, मुन्ना देशमुख, धनराज देशमुख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली असून, तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.
...
अडचणीत ८० हजार रुपये आणायचे कुठून?
महावितरण कंपनीने सन २०१५ पासून आजवर कृषिपंपांची विजेची बिले दिली नव्हती. कंपनीने सहा वर्षाची बिले एकमुस्त दिली असून, बिलाची सरासरी रक्कम ६५ ते ९० हजार रुपये आहे. आधीच आर्थिक अडचणी असून, पेरणीचा काळ आहे. त्यामुळे या काळात बिले भरण्यासाठी एवढी माेठी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
...
शासन व प्रशासन यातील विराेधाभास
थकीत वीजबिलापाेटी राज्यातील काेणत्याही शेतकऱ्याच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी घाेषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे, महावितरण कंपनी विजेचे नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे अथवा बदलविण्यास नकार देत शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. या अधिकाऱ्यांना सरकारचे अप्रत्यक्ष समर्थन असून, सत्ताधारी व विराेधी पक्षाचे नेते शेतकऱ्यांचा हा तमाशा बघणे पसंत करीत आहेत, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.