केंद्राची ऑफर न स्वीकारण्याइतके पवार कच्च्या गुरूचे चेले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 19:46 IST2021-10-13T19:45:52+5:302021-10-13T19:46:15+5:30
Nagpur News राष्ट्रवादीची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली असून, पवार हे केंद्राकडून सत्ता स्थापन करण्यासाठी आलेली ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरूचे चेले नाहीत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

केंद्राची ऑफर न स्वीकारण्याइतके पवार कच्च्या गुरूचे चेले नाहीत
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली असून, पवार हे केंद्राकडून सत्ता स्थापन करण्यासाठी आलेली ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरूचे चेले नाहीत, असा टोला पाटील यांनी लगावला आहे. बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Chandrakant Patil )
आपल्याला केंद्रातील भाजपकडून सत्तेसाठी ऑफर आली होती, मात्र आपण ती स्वीकारली नाही, त्यामुळे तपास यंत्रणेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला त्रास दिला जातोय, असा दावा शरद पवार यांनी केला होता. केंद्राबरोबर असलेल्या सरकारबरोबरच महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं, असेही पाटील म्हणाले.
केंद्राच्या इशाऱ्यानंतरदेखील कोळशाचा साठा नाही
पवार हे सगळ्यांचे गुरू असल्यामुळे पवार आणि त्यांचे शिष्य काहीही झालं की, त्याचा दोष केंद्र सरकारला देऊन मोकळे होतात. केंद्राने कोळसा दिला नाही असे ते म्हणतील. परंतु, पावसामुळे कोळसा कमी मिळेल, त्यामुळे तो वेळेत स्टॉक करा, असे केंद्राने आधीच सांगितले होते. मात्र, ते याबाबत बोलणार नाहीत, असेही पाटील म्हणाले. केंद्राच्या इशाऱ्यानंतरही कोळशाचा साठा करण्यात कमी पडलो, हेही ते सांगणार नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली.
नागपूरचे पालकमंत्री झोपा काढतात का?
यावेळी पाटील यांनी नागपुरातील गुन्हेगारीवरून पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली. नागपुरातील महिला सुरक्षेची स्थिती चिंताजनक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूरच्या गुन्ह्यांवर सर्व बोलायचे, आता पालकमंत्री झोपा काढतात का? त्यांना नागपुरातील गुन्हेगारी कळत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.