‘इन्स्टिट्यूशन फॉर वन हेल्थ’चा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:19+5:302021-02-05T04:45:19+5:30
नागपूर : मनुष्याला होणाऱ्या आजारांपैकी ६१ टक्के आजार पशुजन्य प्रकारातील असतात. यावर संशोधन होऊन उपचारात्मक कार्य करण्यासाठी ‘वन हेल्थ ...

‘इन्स्टिट्यूशन फॉर वन हेल्थ’चा मार्ग मोकळा
नागपूर : मनुष्याला होणाऱ्या आजारांपैकी ६१ टक्के आजार पशुजन्य प्रकारातील असतात. यावर संशोधन होऊन उपचारात्मक कार्य करण्यासाठी ‘वन हेल्थ सेंटर’ म्हणजेच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ झूनोसीस’ नागपुरात सुरू करण्यासाठी मागील दीड वर्षांपासून खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याने या केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे.
मनुष्याला प्राण्यांपासून होणारे रेबीज, अँथ्रेक्स, मेंदुज्वर, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, टीबी, लेप्टोस्पायरोसीस, प्लेग, सिटीकोसीस, निफा व्हायरस, बृसिल्लोसीस, टॉक्सोप्लासमोसिस आणि कृमीजन्य आजारांचा समावेश आहे. आता यात माकडांपासून होणाऱ्या आजारही दिसून येऊ लागली आहे. मागील काही दशकांपासून झुनोटिक आजारांचा प्रादुर्भाव जगभरात वाढला आहे. यावर प्रभावी संशोधन होऊन उपचारात त्याची मदत होण्यासाठी ‘वन हेल्थ सेंटर’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा (माफसू) जागेवर हे केंद्र उभारले जाणार होते. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. खासदार महात्मे यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. आता अर्थसंकल्पात या केंद्रासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याने लवकरच हे केंद्र रुग्णसेवेत असण्याची शक्यता आहे.