‘सुपर’च्या बंद दाराचा रुग्णांना फटका

By Admin | Updated: November 11, 2016 03:03 IST2016-11-11T03:03:55+5:302016-11-11T03:03:55+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे

Patients with 'super' closed doors | ‘सुपर’च्या बंद दाराचा रुग्णांना फटका

‘सुपर’च्या बंद दाराचा रुग्णांना फटका

कर्करोगाचा रुग्ण वेदनेने विव्हळत असताना उघडले गेले नाही दार
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गाचे प्रवेशद्वार दुपारी २ ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. गुरुवारी दुपारी एका कर्करोगाच्या रुग्णाला हे प्रवेशद्वार सुरू होण्याच्या प्रतीक्षेत वेदनेने विव्हळत ताटकळत रहावे लागले. रुग्णाच्या नातेवाईकांनी तेथील सुरक्षा रक्षकाला विनंती करूनही दार उघडले गेले नाही. अखेर रुग्णाला उचलूनच प्रवेशद्वार ओलांडावे लागले.
शहराच्या चारही भागातून येणाऱ्यांना रुग्णांना मेडिकल गाठणे सोपे जावे म्हणून पूर्वी सात प्रवेशद्वार होते. मेडिकल चौक, राजाबाक्षा, वंजारीनगर, कुकडे ले-आऊट, एमआयजी कॉलनी, तुकडोजी पुतळा चौक व हनुमाननगरकडे जाणाऱ्या मार्गावर हे प्रवेशद्वार होते. परंतु या मार्गाने वाढती रहदारी व सुरक्षेला घेऊन आता केवळ राजाबाक्षाकडील प्रवेशद्वारच २४ तास सुरू ठेवले जाते. मेडिकल चौकाकडील प्रवेश द्वार दुपारी २ वाजता बंद होते तर रात्री बंद होणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे जाण्याच्या मार्गावर असलेले प्रवेशद्वार गेल्या महिन्यापासून दुपारी २ वाजता बंद करून सकाळी ८ वाजता उघडले जात आहे.
विशेष म्हणजे, हे बंद द्वार केवळ रुग्णवाहिका व रुग्णाचे भोजन ने-आण करणाऱ्या वाहनासाठीच उघडण्याच्या सूचना खुद्द अधिष्ठात्यांनी दिल्या आहे. यामुळे इतर वेळी काही झाले तरी सुरक्षा रक्षक द्वार उघडत नाही.
गुरुवारी सुपर स्पेशालिटीच्या छातीरोग वॉर्डात भरती असलेल्या ५८ वर्षीय रुग्णाला मेडिकलच्या कर्करोग विभागात तपासणीसाठी पाठवले. ४ वाजता तपासणी झाल्यानंतर आॅटोरिक्षाने हा रुग्ण पुन्हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे निघाला. परंतु मार्गावरील प्रवेशद्वार बंद होते. तब्बल अर्धा तास आॅटोत रुग्ण वेदनेने विव्हळत होता आणि सुरक्षारक्षक मात्र दुरूनच हे चित्र बघत होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकाला बंद प्रवेशद्वार उघडण्याची विनंती केली. परंतु दार उघडले गेले नाही. अखेर रुग्णाच्या नातेवाईकांना सुपर स्पेशालिटीमधून व्हीलचेअर प्रवेशद्वारापर्यंत आणावी लागली. नातेवाईकांनी रुग्णाला उचलून छोट्या द्वारातून बाहेर काढले. व्हीलचेअरवर बसवून वॉर्डात नेले. सुरक्षेच्या नावावर मेडिकल, सुपर स्पेशालिटीत रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.(प्रतिनिधी)

तीन किलोमीटरचे
५० रुपये भाडे
मेडिकल ते सुपरचे अंतर साधारण तीन किलोमीटर आहे. परंतु मेडिकलच्या आपत्कालीन विभागापासून सुपरच्या बंद प्रवेशद्वारापर्यंत रुग्णाच्या नातेवाईकांना ५० रुपये मोजावे लागले.

Web Title: Patients with 'super' closed doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.