रुग्णाच्या आत्महत्येची चौकशी होणार
By Admin | Updated: August 11, 2015 04:05 IST2015-08-11T04:05:07+5:302015-08-11T04:05:07+5:30
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या बुद्धदास अमित बोरकर

रुग्णाच्या आत्महत्येची चौकशी होणार
नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या बुद्धदास अमित बोरकर (६५) या कॅन्सरच्या रुग्णाने शुक्र वारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेला मेडिकल प्रशासनाने गंभीरतेने घेतले असून सोमवारी तीनसदस्यीय समितीला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मोहरना येथील बोरकर यांना काही दिवसांपूर्वी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर तीनवेळा बायोप्सी (पॅथालॉजी परिक्षणाकरिता शरीराचा लहानसा भाग कापणे) करण्यात आली होती. परंतु याचा अहवाल अचूक येत नव्हता. अखेर नातेवाईकांनी कंटाळून बुद्धदास यांना ३० जुलै रोजी मेडिकलच्या शल्यशस्त्रक्रियेचा वॉर्ड क्र. १२ मध्ये भरती केले. येथे आल्यापासून त्यांच्या वागण्यात बदल झाला होता. शुक्रवारी त्याच्या देखभालीसाठी त्याची पत्नीसोबत होती. रात्री १.३० वाजताच्या सुमारास बोरकर यांनी स्वच्छतागृहाच्या खिडकीला दुपट्टा अडकवून गळफास लावला. या प्रकारामुळे रुग्णालयात खळबळ उडाली. कॅन्सरपीडित असल्या कारणाने बोरकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी त्याची चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. (प्रतिनिधी)