रुग्णसेवा कोलमडली
By Admin | Updated: March 22, 2017 02:49 IST2017-03-22T02:49:38+5:302017-03-22T02:49:38+5:30
मेडिकल प्रशासनाला निवासी डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न दुसऱ्या दिवशी सोडविता आला नाही,

रुग्णसेवा कोलमडली
नागपूर : मेडिकल प्रशासनाला निवासी डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न दुसऱ्या दिवशी सोडविता आला नाही, तर निवासी डॉक्टर तो सोडवून घेण्याच्या तयारीतही नसल्याने मेयो आणि मेडिकलमधील रुग्णसेवा कोलमडली आहे. जिथे एका पाळीत सहा निवासी डॉक्टर विभाग सांभाळत होते तिथे एक किंवा दोन इंटर्न व परिचारिका मिळून वॉर्ड सांभाळत आहे. यामुळे उपचार नावापुरताच होत असून अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलेल्या जात आहे. दोन्ही रुग्णालयातील अत्यावश्यक रुग्ण सेवाही प्रभावित झाली आहे.
विशेष म्हणजे, सुरक्षेच्या मागणीवरून सुट्यांवर गेलेल्या निवासी डॉक्टरांना मेडिकल प्रशासनाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
धुळे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद व पुणे येथील रुग्णालयात झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध व सुरक्षेचा मुद्दा रेटून धरत मेयो व मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी सोमवार सकाळी ८ वाजेपासून वैयक्तिक स्वरूपात कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा मंगळवार हा दुसरा दिवस आहे. निवासी डॉक्टर हे मेडिकल व मेयोचा कणा आहे. परंतु या आंदोलनात मेडिकलचे ३०० तर मेयोचे १४० डॉक्टर सहभागी झाल्याने अर्धवट उपचार करुन रुग्णांना वॉर्डातून सुटी दिली जात आहे. दोन्ही रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया अर्ध्यावर आल्या आहेत. केवळ तातडीच्या स्वरुपाच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
या आंदोलनाचा सर्वाधिक फटका बाहेर गावावरून आलेल्या रुग्णांना बसत आहे. अर्धवट उपचार करून पुन्हा दोन-तीन दिवसानंतर येण्यास सांगितले जात आहे. तर काही रुग्ण वेदना सहन करीत मेडिकल आणि मेयोच्या परिसरात आंदोलन संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)
सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे
सुरक्षेच्या मुद्याला घेऊन गैरहजर राहणाऱ्या निवासी डॉक्टरांना मंगळवारी सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पाच बंदुकधारी पोलिसांच्या जागी आता सात पोलीस करण्यात आले आहे. शिवाय चौविस तासत्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल