रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:12+5:302021-03-14T04:09:12+5:30
नत्थू घरजाळे लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, डाॅक्टरांसह पुरेशा ...

रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड
नत्थू घरजाळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, डाॅक्टरांसह पुरेशा कर्मचाऱ्यांचीही नियुक्त केली आहे. मात्र, या रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टरांची कमतरता असल्याने तसेच काही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपचारामध्ये रुग्णांची हेळसांड हाेत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटल, मेयाे रुग्णालय अथवा अन्यत्र हलवावे लागते.
या उपजिल्हा रुग्णालयात रामटेक शहरासह तालुक्यातील शेकडाे रुग्ण नियमित उपचाराला येतात. त्यामुळे या रुग्णालयातील बाह्य रुग्णालय विभागातील रुग्णांच्या नाेंदीवरून या रुग्णालयाचा आवाका लक्षात येताे. या रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टरांची कमतरता असल्याने नागरिकांना वेळीच याेग्य उपचार मिळत नाही. या रुग्णालयातील जनरल सर्जन, फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ व डोळ्यांचे डॉक्टर अशी महत्त्वाच्या डाॅक्टरांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.
एवढेच नव्हे तर, मुख्य परिचारिका, सहायक परिचारिका, दोन फार्मासिस्ट, दोन लॅब टेक्निशियन, एक एक्स-रे टेक्निशियन, एक वरिष्ठ लिपिक, एक अधीक्षक लिपिक आदी कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकीकडे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून, दुसरीकडे रुग्णांनाही याेग्य वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने त्यांची गैरसाेय हाेते. तंत्रज्ञांची पदे रिक्त असल्याने रुग्णांच्या विविध चाचण्याही व्यवस्थित हाेत नाहीत. त्यामुळे राेगाचे याेग्य निदान लावणेही डाॅक्टरांना कठीण जाते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड टाळण्यासाठी या रुग्णालयातील तज्ज्ञ डाॅक्टरांसाेबत रिक्त असलेली तंत्रज्ञ इतर कर्मचाऱ्यांची पदे तातडीने कायमस्वरूपी भरणे गरजेचे आहे.
...
सुविधायुक्त रुग्णालय
या उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची आधीच निर्मिती करण्यात आली आहे. येथे दाेन स्वतंत्र ऑपरेशन थिएटरदेखील आहेत. या रुग्णालयाची इमारत प्रशस्त असून, आवारही बराच माेठा व रमणीय आहे. इमारतीच्या एका भागाला सुरक्षा भिंत नसल्याने आवारात डुकरांचा वावर वाढला आहे. वाॅर्डच्या इमारती वेगवेगळ्या असून, तिथे जाण्यासाठी रस्ते तयार केले आहेत. दुरुस्तीअभावी तसेच पावसाचे पाणी वाहून जात असल्याने त्या रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. गिट्टीयुक्त रस्त्यावरून चालताना रुग्णांना त्रास सहन करावा लागताे.
...
बालराेगतज्ज्ञांची आवश्यकता
या रुग्णालयात महिलांची प्रसूतीदेखील केली जाते. शिवाय, सिझेरियनचीही येथे साेय आहे. नवजात बाळांवर उपचार करण्यासाठी बालराेगतज्ज्ञ डाॅक्टरची आवश्यकता असते. परंतु, या रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टर नसल्याने सिझेरियन न करता त्या महिलांना नागपूरला रेफर केले जाते. जनरल फिजिशियन नसल्यामुळे योग्य औषधाेपचार करणे कठीण झाले आहे. जनरल सर्जन नसल्याने शस्त्रक्रिया करणेदेखील टाळले जाते. प्रसंगी बाहेरून सर्जन बाेलावले जातात. हीच अवस्था डाेळ्यांच्या रुग्णांची आहे.
...
या उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टर्स व तंत्रज्ञांची पदे रिक्त आहेत. ही पदे जर भरली गेली तर रुग्णांवर वेळीच चांगले उपचार करणे शक्य हाेईल. पदे रिक्त असतानाही आम्ही चांगली सेवा देत आहाेत. परंतु, रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.
- डाॅ. प्रकाश उजगरे, अधीक्षक,
उपजिल्हा रुग्णालय, रामटेक.