रुग्ण उष्माघाताचे, लेबल तापाचे!
By Admin | Updated: May 3, 2015 02:02 IST2015-05-03T02:02:41+5:302015-05-03T02:02:41+5:30
उष्माघाताच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि ...

रुग्ण उष्माघाताचे, लेबल तापाचे!
नागपूर : उष्माघाताच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करणे आदी प्रकार टाळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो ) आणि खासगी इस्पितळांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर तापाचे रुग्ण म्हणून उपचार करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
विशेष म्हणजे, २०११ मध्ये मेडिकलच्या शीतकक्षात उष्माघाताचे १७ रुग्ण भरती होते. एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या या रुग्णांची तपशीलवार माहिती आरोग्य संचालक कार्यालयातून मागविण्यात आली होती, परंतु माहिती देण्यास मेडिकल अपयशी ठरले होते. तेव्हापासून कागदपत्रांचा त्रास वाचविण्यासाठी मेडिकलमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची तापाचे रुग्ण म्हणून नोंद केली जाते. यामुळे मेडिकलमध्ये गेल्या चार वर्षात उष्माघाताच्या रुग्णाची नोंदच नाही. असेच मेयोसह खासगी इस्पितळांमध्येही आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पारा ४५ अंशावर गेला आहे. मेडिकल आणि मेयोचे शीतकक्ष तयार आहेत. दिवसाकाठी चार ते पाच उष्माघाताचे रुग्णही उपचारासाठी येत आहेत. परंतु डॉक्टर त्यांच्या केसपेपरवर उष्माघाताची नोंद न करता सर्वसाधारण तापाची नोंद घेत आहे. यामुळे शीतकक्ष वॉर्डात रुग्ण आहेत परंतु ते उष्माघाताचे नाही, असा दावा केला जात आहे. या मागील कारण जाणून घेतले असता, सूत्राने सांगितले, उष्माघात व तापाच्या रुग्णावरील उपचार सारखाच असतो. मात्र उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवणे, त्यांच्यावरील उपचार पद्धतीची बारीकसारीक माहिती ठेवणे, ही माहिती शल्यचिकित्सकांपासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्णाचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे, आदी प्रकार करावे लागतात.
हे टाळण्यासाठी औषधे वैद्यक शास्त्राचे डॉक्टर उष्माघाताच्या रुग्णाची तापाचे रुग्ण म्हणून नोंद करतात. (प्रतिनिधी)