पूर्व नागपुरात हीच का विकासाची गंगा : १२ वर्षापासून रस्ता नादुरुस्त राजीव सिंग नागपूर पूर्व नागपुरात दोन हजार कोटींची विकास कामे सुरू होण्याचा दावा केला जात आहे. परंतु पारडी चौक ते कळमना बाजार दरम्यानचा अर्धा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. चिखली येथील आरटीओ कार्यालयाचा भूमिपूजन कार्यक्रम विचारात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर पॅचरचे काम केले होते. परंतु अवघ्या ४८ तासात पॅचर उखडल्याने खड्डे कायम आहेत. पूर्व व उत्तर नागपूरला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. परंतु स्थानिक आमदार व नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याचे कारण पुढे करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. वास्तविक बांधकाम विभाग ही विदेशी कंपनी नाही. हाही विभाग राज्य सरकारच्या नियंत्रणातच काम करतो. असे असतानाही आमदार वा नगरसेवक या संदर्भात पाठपुरावा करीत नसल्याने या रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. पूर्व नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, केंद्र्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा कोणताही कार्यक्रम असला की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मजूर या भागातील रस्त्यावरील खड्डे बुजवतात.
४८ तासातच उखडले पॅचर!
By admin | Updated: July 31, 2016 02:30 IST