वर्ल्डकप जिंकूनही पदरी उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST2021-02-05T04:51:02+5:302021-02-05T04:51:02+5:30
महाराष्ट्रातील दिव्यांग क्रिकेटपटूंची व्यथा : ५ लाखांच्या बक्षिसांसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा मंगेश व्यवहारे नागपूर : इंग्लंडच्या वर्सेस्टरशायर मैदानावर इंग्लंडच्या संघाला ...

वर्ल्डकप जिंकूनही पदरी उपेक्षा
महाराष्ट्रातील दिव्यांग क्रिकेटपटूंची व्यथा : ५ लाखांच्या बक्षिसांसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा
मंगेश व्यवहारे
नागपूर : इंग्लंडच्या वर्सेस्टरशायर मैदानावर इंग्लंडच्या संघाला मात देऊन भारतीय संघाने दिव्यांग क्रिकेटचा वर्ल्डकप ऑगस्ट २०१९ मध्ये जिंकून आणला. या भारतीय क्रिकेट संघात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश होता. क्रिकेटला दैवत मानणाऱ्या भारतात जो सन्मान सामान्य खेळाडूंच्या नशिबी आला, तो सन्मान दिव्यांग क्रिकेटपटूंना लाभला नाही. राज्याच्या क्रीडा धोरणात तरतूद असूनही अवघ्या ५ लाख रुपयांच्या बक्षिसांसाठी या क्रिकेटपटूंना वर्षभरापासून प्रतीक्षा करावी लागत आहे.
दिव्यांग क्रिकेटचा पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप इंग्लंडमध्ये भरला होता. सहा देशांच्या टीम यात सहभागी झाल्या होत्या. भारतीय टीमने पाकिस्तान, बांग्लादेश, झिंबॉब्वे, अफगाणिस्तान या टीमवर मात करून, वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या टीमला पराभूत केले. दिव्यांगांच्या या भारतीय क्रिकेट टीमने इंग्लंडच्या मातीत भारताचा ध्वज फडकविला. ही टीम जेव्हा विजयाचा वर्ल्डकप घेऊन भारतात परतली, तेव्हा त्यांचे कौतुक करायला सरकारचा साधा प्रतिनिधीही नव्हता. यातील विक्रांत केनी, गुरुदास राऊत व रवींद्र संते या तीन महाराष्ट्रातील खेळाडूंनी भारतीय टीमचे प्रतिनिधीत्व केले होते. या टीमचा विक्रांत केनी हा कर्णधार, तर नागपूरचा गुरुदास राऊत हा उपकर्णधार होता.
यापूर्वी जुलै २०१७ मध्ये महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपद मिळाले होते. महिलांच्या या संघात महाराष्ट्रातील ३ महिला खेळाडूंचा समावेश होता. महाराष्ट्र सरकारने या तीनही महिला खेळाडूंना ५० लाख रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला होता. या देशात सामान्य पुरुषांच्या क्रिकेटला ना पैशाचे मोल आहे, ना ही बक्षिसांचे. अमाप पैसा व अमाप बक्षिसे त्यांच्यावर लुटविली जातात.
मात्र या दिव्यांग खेळाडूंच्या पदरात क्रिकेटचे प्रशंसक असोत की सरकार, अनास्थाच पडली. हे खेळाडू दिव्यांगांसाठी आदर्श आहेत. दिव्यांग असल्यामुळे खेळाच्या माध्यमातून करिअरची दिशा सूकर होईल, अशी भाबडी अपेक्षा दिव्यांगांना आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या दिव्यांगांनी चमकदार कामगिरी केली, त्यांची जर उपेक्षा होत असेल, तर येणाऱ्या खेळाडूंनी काय आदर्श घ्यावा!
- वर्ल्डकप जिंकल्यांतर दिव्यांगाप्रती जाणिव ठेवणाऱ्या काही समाजबांधवांनी आमचा जाहीर सत्कार करून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात यावे, यासाठी सरकारकडे मागणी केली होती. क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महिला क्रिकेटपटूंचा राज्य सरकारने केलेल्या गौरवाचा संदर्भ देत विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे जाहीर सत्कार व ५ लाख रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासंदर्भातील शासन तरतुदीचा उल्लेख करून जानेवारी २०२० ला प्रस्ताव पाठविला होता. पण या प्रस्तावावर अजूनही निर्णय झाला नसल्याची खंत आहे.
विक्रांत केनी, कर्णधार
- वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये देऊन गौरव केला. विदर्भ क्रिकेट संघाने मला २ लाख रुपये देऊन गौरविले. पण केंद्र असो वा राज्य, सरकारचा मान-सन्मान आमच्या नशिबी लाभला नाही. आम्ही सुद्धा सामान्य खेळाडूंइतकीच मेहनत घेतो. एक हात नसतानाही फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण चोखपणे करतो. वर्ल्डकपच नाही तर विविध देशात होणाऱ्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करतो. तरीही ही उपेक्षा...आम्ही दिव्यांग आहोत म्हणून का?
-गुरुदास राऊत, उपकर्णधार