क्षमतेच्या ४० टक्क्यापेक्षा कमी प्रवासी : इथेनॉल बसचा दिवसाला तोटा १० ते १९ हजार रुपये
By Admin | Updated: April 20, 2017 02:40 IST2017-04-20T02:40:45+5:302017-04-20T02:40:45+5:30
नागपूर, नागपूर महानगरपालिका इथेनॉलवर चालणाऱ्या पाच हिरव्या बसेससुद्धा शहरात सिटी बस म्हणून चालवते.

क्षमतेच्या ४० टक्क्यापेक्षा कमी प्रवासी : इथेनॉल बसचा दिवसाला तोटा १० ते १९ हजार रुपये
सोपान पांढरीपांडे नागपूर
नागपूर, नागपूर महानगरपालिका इथेनॉलवर चालणाऱ्या पाच हिरव्या बसेससुद्धा शहरात सिटी बस म्हणून चालवते. या एसी बसचे तिकीट लाल बसच्या पावणे दोन पट आहे. त्यामुळे या हिरव्या एसी बसेसना प्रवासीच मिळत नाहीत. त्यामुळे या बसेस चक्क लाल बसच्या महसुलातून चालत आहेत. ‘‘हिरव्या एसी बसची आसन क्षमता ३२ आहे व शिवाय १६ प्रवासी उभे राहू शकतात. त्यामुळे एकूण प्रवासी क्षमता ४८ होते. परंतु भाडे अधिक असल्याने प्रत्येक बसमध्ये १० ते १४ प्रवासीच प्रवास करतात’’, अशी माहिती मनपाचे परिवहन व्यवस्थापक शिवाजीराव जगताप यांनी दिली.या बसेस चालवण्याचे कंत्राट बंगलोरच्या स्कॅनिया कमर्शियल व्हेईकल्स प्रा. लि. ला मिळाले आहे. या बससाठी मनपा स्कॅनियाला तब्बल ८५ रुपये प्रति किलोमीटर या दराने भाडे देणार आहे. या बसेस मोरभवन बस स्थानकातून, बुटीबोरी (२६ किमी), हिंगणा (१२ किमी), अंबाझरी आॅर्डनन्स फॅक्टरी (१३ किमी), कळमेश्वर (२२ किमी) व कन्हान (२३ किमी) या पाच मार्गावर चालतात अशी माहिती स्कॅनियाचे सिनियर मॅनेजर (सर्व्हिस), रविप्रकाश प्रजापती यांनी दिली.
सदर्हू वार्ताहराने या एसी बसमधून सीताबर्डी ते बुटीबोरी असा दोन तासाचा (एक फेरी) प्रवास केला. त्यावेळी बसमध्ये शेवटपर्यंत जाताना १६ प्रवासी व येताना १२ प्रवासी होते. कंडक्टरच्या म्हणण्याप्रमाणे एका फेरीत रु. १६०० ते रु. २००० पर्यंत महसूल मिळतो.या माहितीवर आधारित बसचा महसूल व बसवर भाड्यापोटी होणारा खर्च यांचा मेळ घातला असता बुटीबोरी बसला आठ तासांच्या शिफ्टमध्ये तब्बल ९६८० रु. तोटा होतो तर दर दिवशी (दोन शिफ्ट) हा तोटा १९,३६० रुपये होतो. यावरून या हिरव्या इथेनॉल बसेस तोट्यात असून त्या लाल बसेसच्या महसुलातून चालत आहेत, हे स्पष्ट आहे.
प्रवासीच नसताना इथेनॉल बसचा अट्टाहास का?
२०१५ मध्ये नागपुरात प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर चालणारी एसी प्रथमच रस्त्यावर आली. त्यानंतर अशा ५५ बसेस चालविण्यासाठी मनपाने २०१६ साली निविदा मागविल्या. या निविदेला या बसेसचे उत्पादन करणाऱ्या स्कॅनिया कमर्शियल व्हेईकल्स व अँथनी गॅरेज या दोनच कंपन्यांनी प्रतिसाद दिला. अँथनी गॅरेजजवळ इथेनॉल बसेस चालवण्याचा पूर्वानुभव नव्हता म्हणून ती निविदा बाद झाली व कंत्राट स्कॅनियाला देण्यात आले. सध्या कंपनीने ५५ पैकी पाच बसेस रस्त्यावर आणल्या आहेत अशी माहिती जगताप यांनी दिली.परंतु प्रवासीच मिळत नसल्याने या इथेनॉल बसेस तोट्यात चालत आहेत तरीही हिरव्या बसेसचा अट्टाहास का? या प्रश्नाचे उत्तर जगताप यांचेकडे नव्हते.