गर्दीमुळे रेल्वेत जनावरांसारखे कोंबले जाताहेत प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 22:35 IST2022-05-16T22:35:22+5:302022-05-16T22:35:54+5:30
Nagpur News गर्दीमुळे रिझर्व्हेशन मिळत नसल्याने ट्रेनच्या बोगीत जनावरांसारखे स्वत:ला कोंबून घेत प्रवासी प्रवास करीत आहेत. तिरुअनंतपुरम गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये हे चित्र दिसत होते.

गर्दीमुळे रेल्वेत जनावरांसारखे कोंबले जाताहेत प्रवासी
नागपूर : कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यामुळे रेल्वेत प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीमुळे रिझर्व्हेशन मिळत नसल्याने ट्रेनच्या बोगीत जनावरांसारखे स्वत:ला कोंबून घेत प्रवासी प्रवास करीत आहेत. तिरुअनंतपुरम गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये हे चित्र दिसत होते.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर ही रेल्वेगाडी सोमवारी ४.४५ वाजता, १२ मिनिटे उशिरा पोहोचली. या गाडीच्या स्लीपर कोचमध्ये एवढी जास्त गर्दी होती की प्रवाशांना टॉयलेटलासुद्धा जाता येत नव्हते. ते फलाटावर पाणी घ्यायलाही उतरू शकत नव्हते. विशेष म्हणजे, ज्यांचे तिकीट कन्फर्म आहे, अशा प्रवाशांना आपल्या सीटवर कसे जावे, असा प्रश्न पडला होता. टॉयलेटमध्ये काच तुटल्याने खाली झालेल्या खिडकीच्या जागेवर प्रवासी बसून होते. पॅन्ट्रीकार स्टाफ, गर्भवती महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना इकडेतिकडे जाणे शक्य होत नव्हते. याच नव्हे, तर लांब पल्ल्याच्या जवळपास प्रत्येकच रेल्वे गाड्यांमध्ये ही स्थिती असल्याचे चित्र आहे.
अतिरिक्त कोच लावा
तिरुअनंतपुरम-गोरखपूर एक्स्प्रेससह सिकंदराबाद -गोरखपूर, बंगळुरू गोरखपूर, यशवंतपूर गोरखपूर एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांची झुंबड होत असल्याने या रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच लावण्याची मागणी भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे केली आहे.
---