रेल्वेतील एसी बंदमुळे प्रवासी घालताहेत गोंधळ
By Admin | Updated: May 24, 2015 02:59 IST2015-05-24T02:59:20+5:302015-05-24T02:59:20+5:30
उन्हाळ्यात एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून रेल्वे प्रशासनाकडुन एसी दुरुस्त करण्यासाठी काहीच ...

रेल्वेतील एसी बंदमुळे प्रवासी घालताहेत गोंधळ
नागपूर : उन्हाळ्यात एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून रेल्वे प्रशासनाकडुन एसी दुरुस्त करण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज प्रवासी गोंधळ घालत आहेत. शनिवारी सायंकाळी गीतांजली एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी सकाळपासून एसी बंद असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर गोंधळ घातला.
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज एसी बंद असल्यामुळे प्रवासी गोंधळ घालण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस सकाळी ६ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून निघाली. गाडी सुटल्यानंतर गाडीतील बी-१ कोचमधील एसी बंद असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी गाडीतील टीटीईला याबाबत तक्रार केली. परंतु पुढील स्थानकावर एसी सुरू करू, असे आश्वासन प्रवाशांना देण्यात आले. परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत एसी सुरू न झाल्यामुळे आणि उन्हामुळे कोचमध्ये बसणे कठीण झाल्यानंतर प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दुपारी १२.३५ वाजता ही गाडी भुसावळ रेल्वेस्थानकावर पोहोचली. यावेळी प्रवाशांचा संयम सुटला त्यांनी एसी सुरू केल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेऊन वारंवार चेनपुलिंग करून १५ मिनिटे गाडी रोखून धरली. यावेळीही त्यांना पुढील स्थानकावर एसी सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर वर्धा रेल्वेस्थानक आल्यानंतर पुन्हा प्रवाशांनी एसी दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु रेल्वेस्थानकावर आलेल्या मेकॅनिकने एसी वर्ध्याला दुरुस्त होऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर तेथून गाडी सुटली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी सायंकाळी ६.५५ वाजता आली आणि प्रवाशांनी गोंधळ घालणे सुरू केले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या कोचमधील एसी दुरुस्त केला आणि ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. (प्रतिनिधी)