पारवे यांची आमदारकी वाचली
By Admin | Updated: October 14, 2015 03:17 IST2015-10-14T03:17:32+5:302015-10-14T03:17:32+5:30
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण केल्या प्रकरणी भिवापूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाने भाजपचे आमदार सुधीर पारवे ...

पारवे यांची आमदारकी वाचली
सत्र न्यायालयात तीन महिने कारावास : हायकोर्टात शिक्षा तहकूब
नागपूर : प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण केल्या प्रकरणी भिवापूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाने भाजपचे आमदार सुधीर पारवे यांना सुनावलेली दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने तीन महिन्याच्या शिक्षेत परिवर्तित केली.
उच्च न्यायालयाने ही शिक्षा तहकूब करून पारवे यांना जामीन मंजूर केला. सुधीर पारवे यांच्या आमदारकीवरील ग्रहण तूर्त हटले आहे.
असे आहे प्रकरण
नागपूर : १० डिसेंबर २००५ रोजी मारहाणीचे हे प्रकरण सेलोटी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडले होते. त्यावेळी पारवे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. महेंद्र बारिकराव धारगावे, असे मुख्याध्यापकाचे नाव, या शाळेत पहिली ते चौथ्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतच खिचडी तयार करून वाटप केली जायची. हे काम नलूबाई मोहोड नावाच्या एका महिलेकडे सोपवण्यात आले होते. धारगावे यांनी खिचडीची तपासणी केली असता तीमध्ये त्यांना अळ्या आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांनी तांदूळ स्वच्छ धुवून खिचडी तयार करा, असे सांगताच ही महिला त्यांच्याशी उद्धट बोलली होती. पुन्हा अळ्या आढळल्याने मुख्याध्यापकाने तिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. परंतु आधीच या महिलेने मुख्याध्यापकास फसवण्याच्या हेतूने जि. प. सदस्य पारवे यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्याध्यापकांनी आपला हात पकडून विनयभंग केला, असे तिने तक्रारीत नमूद केले होते. त्याच वेळी पारवे यांनी शाळा गाठून विद्यार्थ्यांसमोरच धारगावे यांना थप्पड मारली होती. कक्षाबाहेर खेचून पुन्हा मारहाण केली होती. धारगावे यांनी १२ डिसेंबर २००५ रोजी भिवापूर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून पारवे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तापास सहायक फौजदार गंगाधर कडबे यांनी केला होता आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
सत्र न्यायालयात शिक्षा कमी
भिवापूर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या निकालाविरुद्ध आ. सुधीर पारवे यांनी दाखल केलेला पुनर्विचार अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने अंशत: मंजूर करीत दोन वर्ष कारावासाची शिक्षा तीन महिन्याच्या साध्या कारावासात परिवर्तीत केली.
न्यायालयाने पारवे यांची भादंविच्या ३५३ आणि ३३२ या दोन्ही कलमांतर्गतच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली. भादंविच्या ३२३ कलमांतर्गतच्या गुन्ह्यात ३ महिन्याचा साधा कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या पुनर्विचार अर्जाच्या सुनावणी दरम्यान पारवे यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. पी. धर्माधिकारी आणि अॅड. अनिल किलोर यांनी युक्तिवाद करताना १९७९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा हवाला देत हे दोन्ही गुन्हे या प्रकरणात लागू पडत नाही. त्यामुळे आरोपीला निर्दोष ठरवण्यात यावे, असे म्हटले. तर सरकारची बाजू मांडताना प्रमुख जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे आणि फिर्यादी महेंद्र धारगावे यांचे वकील अॅड. लुबेश मेश्राम हे म्हणाले की, विद्यार्थ्यांसमक्ष मारहाणीची घटना घडली आहे.
आरोपीला शिक्षा झाली नाही तर समाजात वेगळा संदेश जाईल. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून पारवे यांना भादंविच्या ३२३ (मारहाण) या कलमात शिक्षा सुनावली.