दुष्काळमुक्त अभियानात भारतीय जैन संघटनेचा सहभाग

By Admin | Updated: April 4, 2017 02:12 IST2017-04-04T02:12:24+5:302017-04-04T02:12:24+5:30

पाणी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र दुष्काळमुक्त ‘वॉटर कप कॉम्पिटीशन’ आयोजित करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील २०५२ गावांनी सहभाग घेतला आहे.

Participation of Jain organization in drought-free campaign | दुष्काळमुक्त अभियानात भारतीय जैन संघटनेचा सहभाग

दुष्काळमुक्त अभियानात भारतीय जैन संघटनेचा सहभाग

प्रफुल्ल पारख : वॉटर कप कॉम्पिटिशनला यांत्रिक मदत
नागपूर : पाणी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्र दुष्काळमुक्त ‘वॉटर कप कॉम्पिटीशन’ आयोजित करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील २०५२ गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना श्रमदानातून जलसंधारणाचे काम करायचे आहे. पाणी फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात गावकऱ्यांच्या श्रमदानाला भारतीय जैन संघटना यांत्रिक सपोर्ट करणार आहे. संघटनेतर्फे या संपूर्ण गावांना जेसीबी, पोकलॅण्ड मशीन जलसंधारणाच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
महाराष्ट्रात येणाऱ्या नैसर्गिक आपदाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना २०१३ पासून कार्यरत आहे. २०१३ साली बीड जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी संघटनेतर्फे श्रमदानाच्या माध्यमातून ११३ तलावांचा गाळ साफ केला होता. २०१५ मध्ये हाच प्रयोग त्यांनी १३ जिल्ह्यात केला. श्रमदानाच्या माध्यमातून पाण्यासाठी स्वावलंबी होण्याची संकल्पना आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रात राबविण्यात आली आहे. गेल्या वर्षी फाऊंडेशनतर्फे ३ तालुक्यातील ११६ गावांमध्ये जलसंधारणाच्या कामासाठी वॉटर कप कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. उत्कृष्ट जलसंधारणाचे काम करणाऱ्या गावांना ५० लाख, ३० लाख व २० लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान केले होते. यावर्षी या स्पर्धेत १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यातील २०५२ गावांनी सहभाग घेतला आहे. श्रमदानाच्या माध्यमातून हे गावकरी पाण्याच्या बाबतीत आपल्या गावांना स्वयंपूर्ण करणार आहे. यासाठी १० हजार लोकांना फाऊंडेशनने प्रशिक्षण दिले आहे. ४५ दिवसांची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची चांगली कामे व्हावी, गावातील भौगोलिक परिस्थिती बघता, श्रमदानात त्रास होऊ नये म्हणून भारतीय जैन संघटनेने त्यांना यंत्राच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून समाजातील संवेदना जपणाऱ्यांना आवाहन करण्यात येत असल्याचे पारख म्हणाले. पत्रपरिषदेला अतुल कोटेचा, रजनीश जैन, सुरेश जैन, दिलीप राँका, रमेश कोचर, विनोद कोचर, राजेश भट्टा उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Participation of Jain organization in drought-free campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.