अर्धवट सिमेंटरोड, खोदकामामुळे पावसाळ्यात होणार नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST2021-05-24T04:07:45+5:302021-05-24T04:07:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील अर्धवट सिमेंटरोड व विविध कामासाठी रस्ते खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी सिमेंटरोडची कामे ...

अर्धवट सिमेंटरोड, खोदकामामुळे पावसाळ्यात होणार नागरिकांना त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अर्धवट सिमेंटरोड व विविध कामासाठी रस्ते खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी सिमेंटरोडची कामे पूर्ण होण्याची शक्यता नाही. डांबरी रस्त्यांची दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. याची वेळीच दखल न घेतल्यास पावसाळ्यात नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. अपघात होण्याची शक्यता आहे.
३०० कोटींच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या तिसऱ्या टप्प्यात १८७ कोटींची ३९ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. परंतु यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. मानेवाडा रोडवरील सिद्धेश्वर सभागृहाच्या बाजूचा सिमेंटरोड मागील वर्षभरापासून अर्धवट आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आजूबाजूच्या नागरिकांना ये-जा करताना फेऱ्याने जावे लागते. लगतच्या पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऑरेंज सिटी ते खामलारोड दरम्यानचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता अर्धवट आहे. भीमचौक ते रिंगरोडचे काम पूर्ण झालेले नाही. शहराच्या अन्य भागांतही काही रस्त्यांची कामे रखडली आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांच्या कामात राज्य सरकार, नासुप्र व महापालिकेला प्रत्येकी १०० कोटींचा वाटा आहे. यातील १८७ कोटींची ३९ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. यात राज्य सरकार व नासुप्रने प्रत्येकी ६२.५० कोटी असा १२५ कोटींचा निधी दिला. तितकाच निधी मनपाला द्यावयाचा आहे. परंतु आर्थिक स्थितीमुळे मनपाकडूनही निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेची यंत्रणा वर्षभरापासून कोरोना नियंत्रणात व्यस्त आहे. याचा फटका मनपाच्या उत्पन्नाला बसला आहे.
.......
जागोजागी खोदकाम
सिवरेज लाइन, केबल टाकण्यासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला खोदकाम करण्यात आले. काही ठिकाणीची कामे अर्धवट असल्याने लोखंडी कठडे लावण्यात आले. परंतु पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास यात पाणी साचून अपघात होण्याचा धोका आहे.
....
मजूर मिळत नाही
कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे सिमेंटरोडच्या कामावरील मजूर परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेले आहेत. यामुळे बहुतेक कामे मागील काही महिन्यापासून ठप्प आहेत. शहरात या कामासाठी मजूर मिळत नसल्याने कंत्राटदारांचीही अडचण झाली आहे, अशीच परिस्थिती रस्त्यांच्या कामांची आहे.
.........
डांबरी रस्त्यांची दुरुस्ती नाही
पावसाळा आला की शहरातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात. परंतु यावेळी पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांवर खड्डे आहेत. मेडिकल चौक ते क्रीडा चौक दरम्यानचा रस्त्यावर खड्डे आहेत. अशीच अवस्था शहरातील इतर डांबरी रस्त्यांची आहे. वस्त्यातील अंतर्गत रस्त्यांचीही अशीच अवस्था आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्त होण्याची शक्यता दिसत नाही.
...
सिमेंट रस्त्यांमुळे आजार वाढले
ज्या मार्गांचे सिमेंटीकरण करण्यात आले, त्या मार्गावरील चौक तसेच सोडण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यांवरून चढ-उतार पार करावा लागतो. उताराच्या भागात दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे कंबर, पाठीला झटके बसतात. त्यातच सिमेंट रस्त्याने जाताना व्हायब्रेशन होते. यामुळे लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.