मेट्रो रेल्वेच्या आधारावर पार्किंग प्लॅन
By Admin | Updated: August 1, 2015 03:58 IST2015-08-01T03:58:20+5:302015-08-01T03:58:20+5:30
संत्रानगरीला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

मेट्रो रेल्वेच्या आधारावर पार्किंग प्लॅन
नागपूर : संत्रानगरीला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी तशा स्वरूपाच्या योजना आखल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता नागपूर शहराचा दीर्घकालीन पार्किंग प्लान तयार केला जाईल. पार्किंग धोरण, पार्किंग इम्प्रूव्हमेंट प्लान देखील तयार केला जाईल. मेट्रो रेल्वे व शहराला मिळणाऱ्या १२५० बस विचारात घेऊन नवे पार्किंग धोरण तयार केले जाईल. संबंधित प्लान तयार करण्यास शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
गुडगावची कंपनी मे. अर्बन मॉस ट्रान्झिट कंपनी लिमिटेड (यूएमटीसी) च्या वित्तीय आॅफरला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. कंपनीला शॉर्ट टर्म ट्रॉफिक इम्प्रूव्हमेंट प्लानसाठी ५ लाख रुपये तसेच पार्किंग पॉलिसी व मास्टर प्लानसाठी ५५.११ लाख रुपये दिले जातील. या दोन्ही खर्चाचा अर्धा-अर्धा भार महापालिका व नासुप्रला उचलायचा आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सांगितले की, प्रस्ताव शॉर्ट पार्किंग पॉलिसीला विचारात घेऊन तयार करण्यात आला होता. मात्र, आता दीर्घकालीन विस्तार विचारात घेऊन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत मेट्रो रेल्वेच्या कॉरीडोरमध्ये पार्किंगचे प्लानिंग करण्याची गरज आहे. याची दखल घेत मेट्रोरेल्वे व स्मार्ट सिटी योजनेत मिळणाऱ्या १२५० बसचा विचार करूनच पार्किंग धोरण व मास्टर प्लान तयार केला जाणार आहे.
पूर्वी १२१ कॉम्प्युटर आॅपरेटर मानधनावर सेवा देत होते. आता कपात करून १०० आॅपरेटर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कामाचा भार वाढला होता. याची दखल घेत कपात केलेले २१ आॅपरेटर पूर्ववत घेण्याचे आदेश देण्यात आले. मालमत्ता करासह इतर कर आॅनलाईन भरणाऱ्यांना काही शुल्क द्यावे लागत होते. आता महापालिकेने एचडीएफसी बँकेशी यासाठी करार करण्यास संमती दिली आहे.