रेल्वेस्थानकावर पार्किंगची दुरवस्था
By Admin | Updated: July 10, 2015 03:01 IST2015-07-10T03:01:06+5:302015-07-10T03:01:06+5:30
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात पार्किंगची दुरवस्था झाल्यामुळे

रेल्वेस्थानकावर पार्किंगची दुरवस्था
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात पार्किंगची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील पार्किंगचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात पार्किंगची दुरवस्था झाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १०० ते ११० रेल्वेगाड्या ये-जा करतात. प्रवाशांची संख्याही ४० हजारावर आहे. रामझुल्याच्या शेजारी रेल्वे प्रशासनाने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली.
परंतु या पार्किंगच्या स्थळाबाबत बहुतांश नागरिकांना माहिती नसल्यामुळे ते रेल्वेस्थानक परिसरात जागा मिळेल तेथे आपली वाहने उभी करतात. अशा वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात.
पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यासमोर मोठी जागा शासकीय वाहनांच्या पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या भागात एखादेच शासकीय वाहन उभे राहते. इतर वेळी ही जागा रिकामी असते.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही जागा दुचाकीच्या पार्किंगसाठी टेंडर काढून उपलब्ध करून दिल्यास येथे २०० दुचाकी उभ्या राहू शकतात आणि रेल्वे प्रशासनाला महसूलही मिळेल. परंतु मागील अनेक महिन्यांपासून ही जागा रिकामी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील पार्किंगचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)