पालक-विद्यार्थ्यांची संभ्रमाचीच परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:22+5:302021-03-13T04:13:22+5:30
नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. अजून शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रकाशिवाय कोणतेही नियोजन केले नाही. यावर्षी विद्यार्थ्यांच्या ...

पालक-विद्यार्थ्यांची संभ्रमाचीच परीक्षा
नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. अजून शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रकाशिवाय कोणतेही नियोजन केले नाही. यावर्षी विद्यार्थ्यांच्या ड्रॉपआऊटचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
पुढच्या महिन्यात इयत्ता १० वी व १२ ची शालांत प्रमाणपत्र परीक्षा होणार असून त्या आधी प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत गुणांच्या परीक्षा घ्यायच्या आहेत. पण कोरोनामुळे सर्वच जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्याने परीक्षेसंदर्भात बऱ्याच विषयावर अजूनही शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्टता करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा सुरूच झाल्या नाही, तर जिथे शाळा सुरू करण्यात आल्या त्यादेखील लवकरच बंद करण्यात आल्या. अचानक शाळा बंद झाल्याने ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आलेला नाही व अजूनही ग्रामीण भागातील ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता व कुणाचाही जीव धोक्यात न येता कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करून परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने गठित केलेल्या समितीने महाराष्ट्रातील भौगोलिक, आर्थिक व सामाजिक विषमतेचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- शिक्षक संघटनांनी सुचविले बदल
१) शाळा तिथे केंद्र असावे .
२)परीक्षा ऑफलाइन घ्यावी.
३) अभ्यासक्रम ५० टक्के कमी करावा व अभ्यासक्रम कमी केल्याची तत्काळ घोषणा करावी.
४) उत्तरपत्रिका संकलन करणे, मूल्यमापनासाठी परीक्षकाकडे पाठविणे, समीक्षकाकडे सादर करणे या सर्व प्रक्रिया तालुका व जिल्हा स्तरावरच असाव्यात.
५) शक्य झाल्यास तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी अन्यथा मागील वर्षीच्या प्रगतीवरून गुणदान करण्यात यावे.
६) पेपर पॅटर्न बदलून वस्तूनिष्ठ व लघुत्तरी प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त असावी.
७) प्रश्नपत्रिकेचा कालावधी जास्तीत जास्त एक ते दीड तास करावा.
८) प्रश्नपत्रिका निम्म्या गुणांवर असावी व प्राप्त गुणांचे रूपांतर पूर्ण गुणात करावे.
९) परीक्षा केंद्रावर पालकांची गर्दी होणार नाही याची पोलीस व प्रशासनाने जबाबदारी घ्यावी.
१०) परीक्षेचे वेळापत्रक शक्यतो सकाळ पाळीतच असावे.
- विद्यार्थी, पालक, शाळांच्या हिताच्या दृष्टीने उपाययोजना करावी
आम्ही काही महत्त्वपूर्ण बदल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, अवर सचिव यांना पाठविले आहे. विद्यार्थी, पालक व शाळांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यात उपाययोजना करावी, अशी अपेक्षा भाजप शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ. कल्पना पांडे यांनी केली आहे.