स्पेशल रेल्वेगाड्यांअभावी अडकले पार्सल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:26+5:302021-01-19T04:10:26+5:30
आनंद शर्मा नागपूर : अनलॉकच्या प्रक्रियेत रेल्वेगाड्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे पार्सल पाठविणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु ...

स्पेशल रेल्वेगाड्यांअभावी अडकले पार्सल ()
आनंद शर्मा
नागपूर : अनलॉकच्या प्रक्रियेत रेल्वेगाड्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे पार्सल पाठविणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्यामुळे हे पार्सल रेल्वेस्थानक, पार्सल कार्यालयात अडकून पडत आहेत. यामुळे पार्सलची बुकिंग करणाऱ्यांना त्रास होत आहे. रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसून एप्रिल ते डिसेंबरदरम्यान पार्सलचे टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद रेल्वे प्रशासन व्यक्त करीत आहे.
रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूरवरून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यांतून दररोज सरासरी १०० गाड्यांतून पार्सल पाठविण्यात येतात; परंतु सध्या ४५ रेल्वेगाड्याच धावत आहेत. यात नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे. यात दिल्ली-चेन्नई मार्गावर जीटी एक्स्प्रेस, तामिळनाडू एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, केरळा एक्स्प्रेस या मोजक्याच गाड्या सुरू आहेत. पार्सल रेल्वेगाडीच्या नावावर केवळ निजामुद्दीन-रेनिगुंटा ही गाडीच चालविण्यात येत आहे. या गाडीने मोठ्या प्रमाणात पार्सल येतात. ही गाडी १० मिनिटेच थांबत असल्यामुळे पार्सल टाकणे आणि उतरविणे होत नाही. त्यामुळे पार्सल कार्यालयातच पडून राहतात. इतर प्रवासी रेल्वेगाड्यांच्या एसएलआर कोचचे दरवाजे आणि सील उघडण्यास वेळ लागत असल्यामुळे रेल्वेगाडी सुटण्याची वेळ होते. यामुळे पार्सल टाकणे, उतरविणे होऊ शकत नाही.
.............
चार्जशिटच्या भीतीने लवकर लावतात सील
पार्सल स्पेशल रेल्वेगाडी असो वा प्रवासी गाडीची एसएलआर बोगी यात पार्सल चढविणे, उतरविण्यास काही वेळ लागतो. या गाड्या वेळेवर चालविण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. अशा स्थितीत पार्सल चढविण्यासाठी आणि उतरविण्यासाठी काही मिनिटे या गाड्या थांबविल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना चार्जशिट देण्यात येत आहे. त्यामुळे चार्जशिटच्या भीतीमुळे रेल्वे कर्मचारी पार्सलची लोडिंग झाली नसली तरीत पार्सल बोगीवर सील लावून गाडीला रवाना करीत आहेत. यामुळे रेल्वे कार्यालयात पार्सल अडकून पडत आहेत. मुंबई-हावडा मार्गावर दोन पार्सल स्पेशल रेल्वेगाड्या सुरू आहेत. तसेच इतर गाड्यांनी पार्सल पाठविणे सुरू आहे; परंतु नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस धावत नसल्यामुळे या मार्गावरील पार्सल अडकले आहेत.
पार्सलच्या शुल्काबाबत गैरसमज
पार्सलचे दर वाढण्याऐवजी पूर्वीपेक्षा २५ ते ३० टक्के कमी झाले आहेत. पार्सल रेल्वेगाड्यांचे दरही कमी आहेत. बाईकचे पार्सल बुक करण्यासाठी आलेल्या काही नागरिकांच्या मते पूर्वीपेक्षा दर वाढल्याचे मत व्यक्त केले आहे. अशा स्थितीत पार्सल शुल्क वाढले की नाही याबाबत अनिश्चितता आहे.
............