पारशिवनी-रामटेक मार्गावर ‘रास्ता रोको’
By Admin | Updated: November 3, 2014 00:41 IST2014-11-03T00:41:57+5:302014-11-03T00:41:57+5:30
ओलित करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नयाकुंड शिवारातील शेतातील रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आला. या शेतकऱ्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला,

पारशिवनी-रामटेक मार्गावर ‘रास्ता रोको’
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू : नयाकुंड शिवारातील घटना
पारशिवनी : ओलित करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नयाकुंड शिवारातील शेतातील रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आला. या शेतकऱ्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला, असा आरोप करीत दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी पारशिवनी-रामटेक मार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
हेमराज पैकुजी निंंबोने (४२, रा. नयाकुंड, ता. पारशिवनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, तो पारशिवनी-आमडी फाटा मार्गावरील सूर्यअंबा स्पिनिंंग मिलमध्ये कामगार म्हणून काम करायचा. हेमराजची नयाकुंड शिवारात शेती असल्याने तो शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शेतात ओलित करण्यासाठी मोटरसायकलने गेला होता. त्याने मोटरसायकल याच शिवारातील सुनील निंंबोने यांच्या ढाब्याजवळ ठेवली आणि शेतात निघून गेल्याची माहिती सुनीलने दिली. सकाळीपर्यंत शेतातून परत न आल्याने सुनीलने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरीही चौकशी केली. हेमराज घरी न आल्याचे स्पष्ट होताच सुनील दुपारी १२ वाजताच्या सुमारास काही तरुणांसह शेतात गेला. त्यावेळी हेमराज हा शेतातील चिखलात पडला असल्याचे सुनीलला आढळून आले.
हेमराजच्या शेतालगत सुधीर वेदप्रकाश अवस्थी यांचेसुद्धा शेत आहे. या शेतातील मोटारपंपासाठी घेतलेल्या अवैध वीजजोडणीच्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने हेमराजला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज स्थानिक गावकऱ्यांनी वर्तविला.
दरम्यान, हेमराजच्या मृत्यूची बातमी नयाकुंड येथे पोहोचताच नयाकुंड येथील चौकात अंदाजे २०० नागरिक गोळा झाले. काही वेळातच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रेटून धरत संतप्त नागरिकांनी पारशिवनी-रामटेक मार्गावर रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. हेमराजच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांना त्वरित अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. नागरिकांनी मार्गावर टायर जाळल्याने या मार्गावरील वाहतूक किमान दोन तास खोळंबली होती.
आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके, पारशिवनी पोलीस घटनास्थळी पोहोचले. दीपक साळुंके यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पारशिवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता रवाना केला. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)