परमबीर सिंग प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:33+5:302021-04-30T04:11:33+5:30

दिवसभर झाले मंथन अन् अखेर गुन्हा दाखल अकोला पोलिसांचा रोल संपला : आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू नरेश डोंगरे ...

Parambir Singh episode | परमबीर सिंग प्रकरण

परमबीर सिंग प्रकरण

दिवसभर झाले मंथन अन् अखेर गुन्हा दाखल

अकोला पोलिसांचा रोल संपला : आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह राज्य पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी गुन्हेगारी षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी बुधवारी दिवसभर राज्य पोलीस दलातील शीर्षस्थ अधिकारी तसेच गृहमंत्रालयातील शिरस्थानचे प्रदीर्घ मंथन झाले. त्यानंतर अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. या पार्श्वभूमीवर परमबीर सिंग तसेच अन्य ३२ अशा एकूण ३३ जणांविरुद्ध बुधवारी अकोल्यात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणातील फिर्यादी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज रोहिदास घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस दलातील अन्य वरिष्ठांकडे काही दिवसांपूर्वी तक्रार पाठवली होती. या तक्रारीत घाडगे यांनी परमबीर सिंग आणि अन्य ३२ जणांनी गुन्हेगारी षडयंत्र रचून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप केला होता. यासोबतच त्यांनी विविध आरोपही केले होते. घाडगे यांच्या तक्रारीची प्रत तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. सोबतच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर, पोलीस महासंचालनालय आणि गृहमंत्रालयातील शीर्षस्थानी बुधवारी दिवसभर प्रदीर्घ मंथन केले. घाडगे यांची तक्रार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तसेच प्रकरण ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असल्यामुळे अकोल्यात झीरो क्राइमी (गुन्हा दाखल) करून तो तपासासाठी ठाणे आयुक्तांकडे वर्ग करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तशा संबंधीचे आदेश अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना देण्यात आले. गुन्हा दाखल करून तो वर्ग करण्यापर्यंत गोपनीयता बाळगण्याचेही आदेश देण्यात आले. त्यानंतर अकोला पोलीस दलातील धावपळ वाढली आणि बुधवारी रात्री १० वाजून ६ मिनिटांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, डॉ. संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर, कल्याण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डी. कांबळे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे, सहायक निरीक्षक ए. पी. अंबुरे, मरगळे, पवार पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, पोलीस नायक बापू तायडे, नायक मोरे, पोलीस निरीक्षक बापू गंगाधर रोहम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन महादेव राऊत, तत्कालीन विधि अधिकारी एन. के. सोनवणे तसेच इतर १० अशा एकूण ३३ जणांविरुद्ध गुन्हेगारी षडयंत्र रचणे आणि ॲट्रॉसिटी अशा एकूण २७ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

---

पहाटेपर्यंत वरिष्ठांना रिपोर्टिंग

गुन्हा दाखल केल्यानंतर अकोला पोलीस अधीक्षकांनी त्या घडामोडींची माहिती संबंधित वरिष्ठांना पहाटेपर्यंत दिली. रात्री १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा फोन सारखा अँगेज होता.

----

आमचा रोल संपला

या संबंधाने आज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, “या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आता आमचा रोल संपला,” अशी छोटेखानी प्रतिक्रिया दिली.

---

Web Title: Parambir Singh episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.