‘पॅरालिसीस’च्या रुग्णाला पाजले रॉकेल
By Admin | Updated: June 23, 2017 02:33 IST2017-06-23T02:33:17+5:302017-06-23T02:33:17+5:30
एका ७० वर्षीय वृद्धाला अर्धांगवायूचा झटका आल्याने कुटुंबातील शिक्षित लोकांनी गावठी उपचार म्हणून कपभर रॉकेल पाजले.

‘पॅरालिसीस’च्या रुग्णाला पाजले रॉकेल
डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे वाचला जीव : फुफ्फुस, मेंदू, रक्ताला पोहचली हानी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका ७० वर्षीय वृद्धाला अर्धांगवायूचा झटका आल्याने कुटुंबातील शिक्षित लोकांनी गावठी उपचार म्हणून कपभर रॉकेल पाजले. या प्रकाराने त्या वृद्धाचा जीवच धोक्यात आला. फुफ्फुस, मेंदू, रक्त व रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचले. वाचण्याची शक्यता फार कमी होती. मात्र, डॉक्टरांच्या कार्यकुशलतेमुळे वृद्धाला जीवनदान मिळाले. एकीकडे जगात किडनी ते हृदय प्रत्यारोपण होत असताना दुसरीकडे गैरसमजातून अर्धांगवायूचा (पॅरालिसीस) झटका आलेल्या रुग्णाला रॉकेल पाजले जात आहे, हा अघोरी प्रकार थांबायला हवा, असे आवाहन ‘क्रिटीकल केअर’ विशेषज्ञ डॉ. राजेंद्र चांडक यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.
कडोरीलाल लोधी (७०) रा. नरसिंहपूर मध्यप्रदेश असे त्या रुग्णाचे नाव आहे. डॉ. चांडक म्हणाले, १५ जून रोजी कडोरीलाल लोधी यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला. ते बेशुद्ध झाले. कुटुंबातील लोकांनी उपचार म्हणून कपभर रॉकेल पाजले. त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाली. मध्य प्रदेशातील स्थानिक डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी तत्काळ नागपुरातील रामदासपेठ येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. १४-१५ तासानंतर रुग्ण रुग्णालयात पोहचला. लोधी हे कोमात गेल्यासारखेच होते. श्वास घेणेही कठीण झाले होते. ते झटके मारत होते. ‘एमआरआय’ केल्यावर मेंदूच्या अनेक रक्तवाहिन्या बुजल्याचे आढळून आले. डाव्या फुफ्फुसाचा बरचसा भाग व उजव्या फुफ्फुसाच्या काही भागालाही नुकसान पोहचले होते. ‘प्लेटलेट’ची संख्या कमी झाली होती. यामुळे थुंकीतून रक्त येत होते. रुग्णाला तत्काळ व्हेंटिलेटरवर ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. शरीरातील अनेक अवयवांवर उपचार सुरू करावे लागले. सात दिवसांच्या शर्तीच्या उपचारानंतर ते या धोक्यातून बाहेर आले. उद्या शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असलीतरी महिन्याभरात मूत्रपिंडाला (किडनी) नुकसान पोहचण्याची शक्यता आहे. फुफ्फुसामध्ये अजूनही समस्या आहे. हे सर्व केवळ कपभर रॉकेलमुळे झाले. ही प्रथा विदर्भासोबतच मध्य प्रदेशात पहायला मिळते. ती बंद होणे आवश्यक आहे. ‘पॅरालिसीस’ला घेऊन आजही सामान्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते दूर होणे आवश्यक असल्याचेही डॉ. चांडक म्हणाले. या रुग्णावरील उपचाराच्या चमूमध्ये डॉ. चांडक यांच्यासोबत डॉ. आर. के. गणेशे, डॉ. किरण पटेल, डॉ. मोहिद अन्सारी, डॉ. अतुल काटकर, मनीष तिवारी, गीतेश्री नायर आदींचा सहभाग होता.
अर्धांगवायूचा झटका आल्यास हे करा!
डॉ. चांडक म्हणाले, अर्धांगवायूचा झटका आल्यास रुग्णाला काही खायला, प्यायला देऊ नये. रुग्णाला एका कडेला झोपवून रुग्णालयात आणायला हवे. आणताना पायापासून खांदा, डोके वर राहील याची दक्षता घ्यायला हवी. जेवढ्या लवकर रुग्णालयात रुग्ण येईल तेवढ्या लवकर तो बरा होण्याची शक्यता अधिक राहते.
अर्धांगवायूचा झटका आल्यास हे करा!
डॉ. चांडक म्हणाले, अर्धांगवायूचा झटका आल्यास रुग्णाला काही खायला, प्यायला देऊ नये. रुग्णाला एका कडेला झोपवून रुग्णालयात आणायला हवे. आणताना पायापासून खांदा, डोके वर राहील याची दक्षता घ्यायला हवी. जेवढ्या लवकर रुग्णालयात रुग्ण येईल तेवढ्या लवकर तो बरा होण्याची शक्यता अधिक राहते.