गायब होणाऱ्या गुन्हेगाराची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST2021-03-07T04:09:48+5:302021-03-07T04:09:48+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गायब होणाऱ्या गुन्हेगाराने सध्या उपराजधानीत दहशत निर्माण केली आहे. तो विना नंबरच्या ...

गायब होणाऱ्या गुन्हेगाराची दहशत
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गायब होणाऱ्या गुन्हेगाराने सध्या उपराजधानीत दहशत निर्माण केली आहे. तो विना नंबरच्या कारने फिरतो. दिवसाढवळ्या गुन्हे करतो आणि नंतर अचानक गायब होतो. त्याचा नाव, पत्ता माहीत नसल्याने त्याच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
चार दिवसांपूर्वी प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शोरूमशी संबंधित मंडळीमध्ये या गुन्हेगाराने खळबळ उडवून दिली. अनेक जण आजूबाजूला असताना त्याने तेथून एक नवी कोरी कार चोरली. ही कार घेऊन तो गुन्हे करीत फिरत आहे. त्याने एका अधिकाऱ्यालाही दोन दिवसांपूर्वी धडक देऊन जबर जखमी केल्याची माहिती आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना माहिती मिळते. मात्र, गुन्हेगाराच्या ताब्यातील कारच्या मागेपुढे प्लेटवर नंबर नसल्याने त्याला शोधणे कठीण झाले आहे. त्यामुळे या गुन्हेगाराची दहशत निर्माण झाली आहे. त्याला जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे. त्यानुषंगाने पोलीस यंत्रणा कामी लागली आहे.
---
तो हाच आहे का?
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी सरसावलेल्या एका वाहतूक शाखेच्या पोलिसाला बेदरकारपणे चिरडण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. त्याच्या कारवरही मागेपुढे नंबर नव्हता. त्यामुळे गायब होणारा गुन्हेगार हाच आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. पोलीस आरोपीला शोधण्यासाठी धागेदोरे जुळवित आहेत.
----