पंडित प्रभाकर धाकडे यांचा सत्कार
By Admin | Updated: October 26, 2016 03:06 IST2016-10-26T03:06:01+5:302016-10-26T03:06:01+5:30
सूरमणी पंडित प्रभाकर धाकडे यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी साई सभागृहात त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

पंडित प्रभाकर धाकडे यांचा सत्कार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व कलावैभवचे संयुक्त आयोजन
नागपूर : सूरमणी पंडित प्रभाकर धाकडे यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी साई सभागृहात त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व कलावैभव संस्थेतर्फे आयोजित या सत्कार सोहळ्यात स्वरप्रवाह हा विशेष सांगितिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दिलीप डबीर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. प्रमोद मुनघाटे, सामाजिक कार्यकर्ते विजय मेश्राम, माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, मोहम्मद सलीम उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या संकल्पनेतून आयोजित या समारंभात पंडित प्रभाकर धाकडे व त्यांच्या पत्नी उर्मिला धाकडे यांचा शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आ. डॉ. मिलिंद माने यांनी धाकडे यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. डॉ. नितीन राऊत यांनी गुरुजींच्या व्हायोलिनचे सूर असेच निनादत राहावे, अशा शुभेच्छा देत त्यांना पद्मश्री मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. दिलीप डबीर यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून गुरुजींच्या सुरेल व्हायोलिनसह रंगलेल्या कीर्तन महोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला. पंडित प्रभाकर धाकडे यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सत्कार समारंभाचे संचालन अशोक जांभुळकर यांनी केले.
यानंतर गुरुजींच्या संगीतबद्ध गीत-गझलांचा स्वरप्रवाह हा सांगितिक कार्यक्रम सादर झाला. यात छाया वानखेडे, शाम जैन, मंजिरी वैद्य-अय्यर, रसिका करमाळेकर, मोहिनी बरडे, धनश्री बुरबुरे, पारिजात काळीकर, शेफाली चौरसिया, मोनिका देशमुख यांनी गीते सादर केली.
पंडित धाकडे, भूपेश सवाई, श्रीकांत पिसे, प्रमोद बावणे, अरविंद उपाध्ये, सुभाष वानखेडे, मन्ना डॉन हे सहवादक होते. निवेदन सय्यद शिरीन यांनी केले. (प्रतिनिधी)