पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील मागितली होती इंग्रजांची माफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2023 06:44 AM2023-04-03T06:44:46+5:302023-04-03T06:48:35+5:30

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा; राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र

Pandit Jawaharlal Nehru also apologized to the British claims Central Minister Anurag Thakur addressing in Lokmat National Media Conclave | पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील मागितली होती इंग्रजांची माफी!

पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील मागितली होती इंग्रजांची माफी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीदेखील इंग्रजांची माफी मागितली होती, असा दावा रविवारी येथे केला. नागपुरात आयोजित ‘लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. या ‘कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘लोकमत’ समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते.

अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, जालियनवाला बाग नरसंहारानंतर उफाळलेला असंतोष आणि अकालींचे आंदोलन यादरम्यान पंजाबमधील नाभा संस्थानात बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु मातीच्या भिंती असलेल्या तुरुंगात राहणे नेहरू यांना सहन झाले नाही व पुन्हा संस्थानात प्रवेश करणार नाही, या आशयाचा लेखी माफीनामा त्यांनी दिला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी व्हाइसरॉयकडे रदबदली केली. त्यामुळे दोन आठवड्यांत शिक्षा माफ झाली, असा घटनाक्रम ठाकूर यांनी सांगितला.

यावेळी अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी तसेच बिहार सरकारवर सडकून टीका केली. राहुल गांधी यांचे ‘माफी मागायला मी सावरकर नाही’ हे वक्तव्य म्हणजे ते कधीच सावरकर होऊ शकत नाहीत, ही कबुली आहे. कारण तशी तपस्या व त्याग असावा लागतो. कुणाचा सन्मान करू शकत नसाल तर कमीत कमी अपमान करायला नको, असे ठाकूर म्हणाले. स्वत: राहुल गांधी यांनी २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. आता ते म्हणतात की,‘गांधी कधीच माफी मागत नाहीत.’ यातून त्यांचा अहंकार दिसून येताे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात केंद्राची काहीच भूमिका नाही, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची मांदियाळी

‘लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘एएनआय’च्या संपादक स्मिता प्रकाश, न्यूज १८ (हिंदी)चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, न्यूज १८-लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, पंजाब केसरी व नवोदया टाइम्सचे कार्यकारी संपादक अकु श्रीवास्तव, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, हिंदुस्तान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीपकुमार मैत्र, एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर प्रत्यक्ष तर टाइम्स नेटवर्कच्या समूह संपादक नविका कुमार आभासी पद्धतीने सहभागी झाल्या. लोकमत डिजिटलचे संपादक आशीष जाधव व लोकमत समाचारचे सहयोगी संपादक संजय शर्मा यांनी या सर्वांना बोलते केले.

माध्यमांची भूमिका राष्ट्रहिताची हवी

पंतप्रधान मोदी हे काही पत्रकारांच्या मनात आहेत तर काहींच्या डोक्यात आहेत. मात्र विकसनशील देशातून विकसित देशाकडे जाण्याची वाटचालीत माध्यमांची भूमिका ही सकारात्मक व राष्ट्राच्या हिताची असावी, असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.

भारतीय माध्यमांमध्ये जगाचे नॅरेटिव्ह तयार करण्याची क्षमता

भारतात सरकारविरोधात जनमत तयार करण्याचा किंवा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न विदेशी माध्यमे करतात असे बोलले जाते. परंतु, हे अजिबात शक्य नाही. एकशे चाळीस कोटींच्या देशात असे घडणे शक्य नाही. भारतीय जनमानसही त्याला कधी तयार होणार नाही. अशा विदेशी माध्यमांची पोहोच, त्यांचा खप किंवा दर्शकसंख्येची भारतीय माध्यमांशी तुलना केली तर ती अगदीच किरकाेळ ठरतात. त्या तुलनेत भारतीय माध्यमे अधिक ताकदवान आहेत. जगाचे नॅरेटिव्ह तयार करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का?’ या विषयावरील चर्चेत बोलताना म्हटले.

आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारा जनसंघ, नंतरचा भारतीय जनता पक्ष, तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण आधीही करीत होते, आताही करत राहतील व भविष्यातही करतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जागतिक क्रमवारी जाहीर करणाऱ्या संस्थांच्या सर्वेक्षण पद्धतीवरही त्यांनी जोरदार टीका केली.

बिहारमध्ये ‘जंगलराज रिटर्न्स’, पुरस्कारवापसी गँग कुठे आहे?

- बिहार व पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून अनुराग ठाकूर यांनी टीकास्त्र सोडले. बिहारमध्ये काही विशिष्ट लोक सत्तेवर आले की तेथे हिंसा वाढते. आताची स्थिती पाहून तेथे ‘जंगलराज रिटर्न्स’ असेच म्हणावे लागेल. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तुष्टीकरणाचे राजकारण करत असून तेथील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. 
- हाच प्रकार भाजपशासित राज्यात झाला असता तर काही बुद्धिजीवींनी आक्रोश केला असता. मात्र आता ती पुरस्कारवापसी गँग कुठे गेली आहे, असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला. दिल्लीत केजरीवाल यांचे तीन मंत्री तुरुंगात असूनदेखील ते जगाला ज्ञान वाटत आहेत, अशी टीकादेखील त्यांनी केली.

मतभिन्नता व पक्षपात यामध्ये फरक असायला हवा : डॉ. विजय दर्डा

लाेकमतच्या एडिटाेरियल बाेर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी मतभिन्नता व पक्षपातामध्ये फरक आहे, असे मत व्यक्त केले. वर्तमान माध्यमे समाजाप्रति असलेल्या जबाबदाऱ्या याेग्य पद्धतीने पार पाडत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वृत्तवाहिन्या राजकीय वार्तांकन पक्षपातीपणे करतात, असा नेहमीच आरोप होत असतो. देशात शेकडाे वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या आणि हजाराे वेब पाेर्टल आहेत. त्या प्रत्येकाचे स्वत:चे मत आहे. लाेकशाहीमध्ये विचारभिन्नता आवश्यक आहे. 
माध्यमांनी ही भिन्नता ठेवावी, पण पक्षपात करू नये. सरकारच्या चांगल्या कामाची प्रशंसा करावी, तसेच चुकीच्या कामावर टीकाही करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पत्रकारितेमध्ये एक सूक्ष्म लक्ष्मणरेषा आहे आणि माध्यमांनी तिचे पालन करणे आवश्यक आहे. 
ही लक्ष्मणरेषा साेडल्यानेच माध्यमांवर टीका हाेत आहे. बहुतेक माध्यमे निष्पक्ष आहेत, पण काही माेजक्या संस्थांमुळे एकूणच माध्यमांना बदनामी सहन करावी लागते. काेणत्याही गंभीर समस्येवर माध्यमांचा सूर एक असायला हवा. परंतु, तसे हाेताना दिसत नाही, अशी खंतही डाॅ. दर्डा यांनी व्यक्त केली.

Web Title: Pandit Jawaharlal Nehru also apologized to the British claims Central Minister Anurag Thakur addressing in Lokmat National Media Conclave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.