पाकची दिवाळखोरी, कर्जासाठी ‘जिन्ना पार्क’ गहाण ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:52+5:302021-02-05T04:44:52+5:30
भारतीय नेत्यांवर याअगोदर अनेकदा ‘जिन्ना’चे राजकीय भूत बसल्याचे दिसून आले. यातून काही जणांचे राजकीय नुकसानदेखील झाले. मात्र, पाकिस्तानच्या निर्मितीचे ...

पाकची दिवाळखोरी, कर्जासाठी ‘जिन्ना पार्क’ गहाण ठेवणार
भारतीय नेत्यांवर याअगोदर अनेकदा ‘जिन्ना’चे राजकीय भूत बसल्याचे दिसून आले. यातून काही जणांचे राजकीय नुकसानदेखील झाले. मात्र, पाकिस्तानच्या निर्मितीचे श्रेय जात असलेल्या मो. जिन्ना यांच्या भगिनीच्या नावावर असलेल्या ‘पार्क’ला गहाण ठेवण्यासाठी पाऊल उचलणे हे अलीकडच्या काळातील पाकचे सर्वांत मोठे अपयश ठरेल. मागील अनेक काळापासून पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट असून मूलभूत सुविधांसाठी निधीची चणचण जाणवत आहे. जागतिक पातळीवर त्यांचे नेते मान वर करून बाता मारत असले तरी प्रत्यक्षात घराच्या आतील वासे पोकळ झाले आहेत. पाकिस्तानला सकाळी सकाळी वास्तवाचा आरसा दाखविणाऱ्या एका वर्तमानपत्रानेच ही ‘पोलखोल’ केली आहे.
पाकिस्तानवर कर्ज इतके वाढले आहे की देशातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडे मोठ्या इमारती, मार्ग गहाण ठेवण्यात आले आहेत. याच्यात भरीस भर म्हणून आता ‘जिन्ना पार्क’ समावेश होण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळात यासंबंधातील प्रस्ताव मांडण्यात येणार असून पंतप्रधान इम्रान खान हेदेखील या बैठकीत ‘ऑनलाइन’ माध्यमातून सहभागी होतील. राजधानी इस्लामाबादमध्ये ‘फातिमा जिन्ना पार्क’ हा ‘कॅपिटल पार्क’ किंवा ‘एफ-९ पार्क’ म्हणूनदेखील ओळखला जातो. ७५९ एकरचा विस्तार असलेला हा ‘पार्क’ राजधानीची शान मानला जातो. पर्यटकांची येथे नेहमी गर्दी असते. या ‘पार्क’ला आणखी विकसित करावे, अशी मागणी होत असताना सरकारने पर्यावरणप्रेमी व पर्यटकांच्या अपेक्षांवर पाणीच फेरले आहे.
बौद्धिक नंतर आता आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल
‘पार्क’ला गहाण ठेवण्याचा मुद्दा सरकारशी निगडित असला तरी यातून पाक दिवाळखोरीकडे किती वेगाने वाटचाल करत आहे याचे प्रत्यंतर येत आहे. दहशतवाद्यांना सर्वप्रकारची ‘रसद’ पुरविण्यात धन्यता मानणाऱ्या शासनकर्त्यांचे सामान्य जनतेकडे होणारे दुर्लक्ष, सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास येणाऱ्या अडचणी, ढासळलेले आर्थिक नियोजन या बाबी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. भारतातील आर्थिक व राजकीय स्थितीवर तेथील काही ‘अतिहुशार’ नेते वक्तव्य करताना दिसून येतात. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की ‘जिनके घर शिशे के होते है, वो दुसरों पर पत्थर नही फेका करते’.