आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पहलगामच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील ३ ते ४ हजार पर्यटक तिथे असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात परत आणले जात आहे. यासंदर्भात सरकारमध्ये कुठेही विसंवाद नाही किंवा श्रेयवादही नाही. या विषयावर राजकारण करण्याचे दिवस नाही तर देशाला मजबूत करण्याचे दिवस असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सकाळी नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलत होते. पहलगामच्या घटनेनंतर सरकारमध्ये विसंवाद असून श्रेयवाद सुरू असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, "पहलगामच्या घटनेनंतर त्याठिकाणी असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्याठिकाणी जाऊन पर्यटकांची भेट घेणे यात काही राजकारण नाही. किवा गिरीश महाजन यांना पाठवणे यातही काही राजकारण नाही. ते तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे त्यामुळे त्यांना पाठवले आहे. सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही."
"यामध्ये काही राजकारण नाही किवा कुठलाही श्रेयवाद नाही. देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान फार मोठे आहे. या घटनेमध्ये संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबत सर्व पक्षांना आवाहन केले आहे. यामध्ये जे काही लोक राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्यांना लख लख लाभो", असेही ते म्हणाले.