पाचगाव देशातील पहिले वायफाय गाव

By Admin | Updated: July 5, 2015 02:53 IST2015-07-05T02:53:42+5:302015-07-05T02:53:42+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर नागपूर जिल्ह्यातील पाचगाव (ता. उमरेड) येथे नि:शुल्क ‘वायफाय’ सुरू ..

Pagagaon, the first Wifi village in the country | पाचगाव देशातील पहिले वायफाय गाव

पाचगाव देशातील पहिले वायफाय गाव

उमरेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर नागपूर जिल्ह्यातील पाचगाव (ता. उमरेड) येथे नि:शुल्क ‘वायफाय’ सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यानुसार पाचगाव हे देशातील पहिले ‘वायफाय’ गाव ठरले आहे. संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत २५ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन शनिवारी पाचगाव येथे करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे, विकास कुंभारे, अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, डॉ. राजीव पोतदार, अशोक मानकर, आनंद राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी, पंचायत समिती सभापती शालू मेंढुले, उपसभापती गोविंदा इटनकर, पाचगाव येथील सरपंच पुष्पशीला मेश्राम, उपसरपंच रामाजी हटवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
महाराष्ट्रात १०० टक्के ग्रामपंचायती वायफाय यंत्रणेशी जोडण्यात येणार असून, देशभरातील अन्य राज्यांत ४० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा पुरविण्यात येणार आहे. सदर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असून, डिसेंबर २०१५ पर्यंत या टेक्नॉॅलॉजीचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. संसद आदर्श ग्राम या योजनेंतर्गत ‘विकास आराखडा’ही तयार करण्यात आला असून, केंद्र शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविला गेला. या योजनेत विकास आराखडा सादर करणाऱ्या पहिल्या गावाची नोंदही पाचगाव या गावाची झाली असून, येत्या सहा महिन्यात विकास कामांच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणाही करण्यात येणार आहे़
बेरोजगारीच्या विळख्यातून मुक्त झालेला युवावर्ग, व्यसनमुक्त समाज, कर्जमुक्त शेतकरी असे स्वप्न मी या गावाचे बघत आहे. जोपर्यंत आपण आदर्श होणार नाही, तोपर्यंत गावही आदर्शाच्या पंक्तीत बसणार नाही. माझेही गाव असेच झाले पाहिजे, असे अन्य गावांसमोर आदर्शव्रत हे गाव उभारायचे आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करण्यास मी कटिबद्ध असल्याचे वचनही यावेळी गडकरी यांनी दिले.
तावडे म्हणाले, महाराष्ट्रात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुमारे १० लाख शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यापुढे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही. विद्यार्थ्यांना हवे असलेले आणि अंगभूत कलागुण कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणावर यापुढे आपला भर राहील. दहावीत एकही विद्यार्थी नापास ठरणार नाही, अशी योजनाही अमलात आणली असून प्रशिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोणीकर यांनी सात कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन याकडेही लक्ष दिले पाहिजे असे म्हणत राज्यातील ५६ लाख कुटुंबाकडे शौचालयाची निर्मिती होणार असल्याचेही ते बोलले. खासदार कृपाल तुमाने यांनी ५० लाख रुपयांचा निधी पाचगावसाठी जाहीर केला. आमदार सुधीर पारवे यांनी भूमिगत नाल्यांसाठी आमदार निधी देणार असल्याचे जाहीर केले. शासनाच्या योजनेबाबतचा आढावाही सादर केला. संचालन डॉ. अर्चना कडू यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. (प्रतिनिधी)
योजनांचा पडला पाऊस
सुमारे आठवडाभरापासून पावसाने सर्वत्र दांडी मारली असली तरी शासनाच्या विविध योजनांचा ‘पाऊस’ मात्र शनिवारी उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे पडला. एकूण २५ कोटी रुपयांच्या कामांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करताच आता पाचगावचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. गिट्टीखदानीचे गाव ‘पाचगाव’ अशी ओळख असणाऱ्या या गावात संसद आदर्श ग्राम योजनेमुळे आदर्श गावाच्या यादीतही या गावाची नोंद झाली आहे. बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकऱ्यांच्या मालाला दाम, विकासकामांची गंगा आणि संपूर्ण ‘हायफाय, वायफाय’ यंत्रणा अशी वैभवसंपन्नता पाचगाव या गावाला लाभणार आहे. पाचगाव येथे इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण आहे. आता या गावात अकरावी आणि बारावीसोबतच तंत्रशिक्षणाचीही जोड देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. तसेच शाळा दुरुस्तीसाठी १ कोटी ४४ लाख रुपयांचा निधीही जाहीर केला. ई- लायब्ररी सेवा, समाजभवन, शुद्ध, स्वच्छ पाण्यासाठी ७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, मुख्य मार्गाच्या सिमेंटीकरणासाठी ६ कोटीचा निधी, प्राथमिक आरोग्य केंद्र, अ‍ॅम्बुलन्स सुविधा, पशुवैद्यकीय दवाखाना, क्रीडांगण, व्यायामशाळा, स्मशानभूमी, जलयुक्त शिवार, कोल्हापुरी बंधारा आदी योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे.

Web Title: Pagagaon, the first Wifi village in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.