विधवेशी लग्न करून पाेलीस निरीक्षक फरार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:43+5:302021-03-04T04:12:43+5:30
नागपूर : एका विधवा महिलेशी लपून लग्न करून शहर पोलीस विभागातील निरीक्षक फरार झाला. या अधिकाऱ्याचा खरा प्रकार उघडकीस ...

विधवेशी लग्न करून पाेलीस निरीक्षक फरार ()
नागपूर : एका विधवा महिलेशी लपून लग्न करून शहर पोलीस विभागातील निरीक्षक फरार झाला. या अधिकाऱ्याचा खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. शहर पोलीस विभागातील भरोसा सेल या प्रकरणाचा तपास करीत आहे.
या प्रकरणात अधिकारी शहर पोलीस विभागात नियुक्तीपासूनच चर्चेत आहे. पीडित महिला अमरावतीतील एका उच्चभ्रू कुटुंबातील आहे. २०१० मध्ये शिक्षक असलेल्या पतीच्या मृत्यूनंतर ती मुलासोबत राहत होती. २६ जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवर तिची या अधिकाऱ्यासोबत ओळख झाली. एक वर्ष दोघांमध्ये फेसबुकवर चॅटिंग होत हाेती. महिलेच्या तक्रारीनुसार पाेलीस निरीक्षकाने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या मुलाचाही स्वीकार करण्याचे आश्वासन दिले. महिला लग्नासाठी तयार झाली. तिच्या कुटुंबीयांनी याला विरोध केला. परंतु चांगला जीवनसाथी मिळत असल्याच्या अपेक्षेने महिला लग्नासाठी तयार झाली. ८ नोव्हेंबर २०२० रोजी वर्धा येथील कौंडल्यपूर स्थित एका धार्मिक ठिकाणी त्यांनी लग्न केले. त्यानंतर ते नंदनवन येथील एका सोसायटीत भाड्याने राहू लागले. काही दिवसांनंतर पाेलीस निरीक्षकाला भेटण्यासाठी वेगवेगळ्या महिला येऊ लागल्या. त्यामुळे तिला संशय आला. नंतर त्याचे आधीच लग्न झाले असल्याची माहिती झाली. तिने गोंधळ घातल्याने पाेलीस निरीक्षकाने तिला दुसऱ्या ठिकाणी राहण्यास तयार केले. नोव्हेंबर २०२० मध्ये दोघेही फ्रेण्ड्स कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये राहू लागले. हा फ्लॅटसुद्धा त्याच्या एका पोलीस अधिकारी मित्राचाच आहे.
फ्रेण्ड्स कॉलनीत आल्यापासून काही दिवसातच त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. त्या पाेलीस निरीक्षकाचे दुसऱ्या महिलांसोबतचही संबंध असल्याचे उघडकीस आले. यानंतर तो तिला मारहाण करू लागला. त्याने तिला माहेरी जाण्यास सांगितले. कुटुंबाच्या मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे ती आई-वडिलांकडेही जाऊ शकत नव्हती. त्यामुळे ती मार सहन करीत त्याच्यासोबत राहू लागली. १८ फेब्रुवारी रोजी तो पाेलीस निरीक्षक तिला सोडून फरार झाला. त्याने त्या महिलेचा नंबर मोबाईलमध्ये ‘ब्लॉक’ केला. महिलेने शेजाऱ्यांच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने तो परत येणार नाही, असे म्हणत तिला तेथून जाण्याचा सल्ला दिला. महिलेने या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिची तक्रार भरोसा सेलकडे पाठवली. आठवडा झाला तरीही भरोसा सेलनेही यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. भरोसा सेलचे अधिकारी पाेलीस निरीक्षकही त्यांना फोनवर प्रतिसाद देत नसल्याचे सांगत आपला हात झटकत आहेत.
यापूर्वीही झाली आहे बदली
या प्रकरणाशी संबंधित असलेला पाेलीस निरीक्षक हा पूर्वी झोन चार अंतर्गत असलेल्या एका ठाण्यात कार्यरत होता. पोलिसांच्या नावावर फसवणूक करणाऱ्या चर्चित महिलेच्या प्रकरणात त्याचे नाव आल्याने त्याची बदली तातडीने कंट्रोल रूममध्ये करण्यात आली होती. यानंतरही त्याने महिलांची फसवणूक करणे साेडले नव्हते. महिलांशी मैत्री करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यावरून काही अधिकारी यापूर्वीही चर्चेत राहिले आहेत. अशा प्रकरणांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळते. ताज्या प्रकरणाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले आहे.