‘आयआयएम-नागपूर’च्या संचालकीय मंडळ स्थापनेला वेग

By Admin | Updated: November 20, 2015 03:08 IST2015-11-20T03:08:28+5:302015-11-20T03:08:28+5:30

‘आयआयएम-नागपूर’चे वर्ग सुरू झाले असून संस्थेला मिहान येथे जागादेखील देण्यात आली आहे.

The pace of installation of IIM-Nagpur Board of Directors | ‘आयआयएम-नागपूर’च्या संचालकीय मंडळ स्थापनेला वेग

‘आयआयएम-नागपूर’च्या संचालकीय मंडळ स्थापनेला वेग

येत्या महिन्याभरात चित्र स्पष्ट होणार
नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’चे वर्ग सुरू झाले असून संस्थेला मिहान येथे जागादेखील देण्यात आली आहे. आता संस्थेसाठी संचालकीय मंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चेअरमन तसेच सदस्यांच्या नियुक्तीसाठी सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित सदस्य नामनिर्देशित होईपर्यंत कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव विनय शील ओबेरॉय यांच्याकडे संचालकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता प्रभार देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या मंडळातील १५ सदस्यांमध्ये राज्य शासन, उद्योगजगत, शिक्षण क्षेत्र तसेच ‘आयआयएम’मधील तज्ज्ञांचा समावेश राहू शकतो.
देशातील सर्व ‘आयआयएम’चा कारभार हा संचालकीय मंडळाच्या माध्यमातूनच चालतो. २०१३ च्या कंपनी कायद्यानुसार संचालक मंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी लागते. संचालकीय मंडळाच्या स्थापनेशिवाय ‘आयआयएम-नागपूर’ची नोंदणी होऊ शकत नाही. त्यांनतर या मंडळाकडून संचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. संचालकच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. ही बाब लक्षात घेता ‘आयआयएम-अहमदाबाद’च्या प्रशासनाकडून सातत्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासोबत संवाद साधण्यात येत आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीने ‘आयआयएम-नागपूर’चे प्रकल्प समन्वयक ले. कर्नल (निवृत्त) मकरंद अलूर यांच्याकडे जागेचे वाटप पत्र सोपविले.
संचालकीय मंडळासाठी काही नावे अंतिम करण्यात आली आहेत. येत्या महिन्याभरात चित्र स्पष्ट होईल. शिवाय ‘आयआयएम-नागपूर’च्या इमारतीचे भूमिपूजनदेखील डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊ शकते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.(प्रतिनिधी)

दर्जा कायम राखण्यावर भर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती ही लांबलचक व वेळखावू प्रक्रिया आहे. त्यामुळे तोपर्यंत ‘आयआयएम-अहमदाबाद’ येथील तज्ज्ञ शिक्षकच येथे वर्ग घेणार आहेत. शिवाय काही ‘व्हिजिटिंग’ प्राध्यापकदेखील राहतील. ‘आयआयएम’च्या शिक्षणप्रणालीचा दर्जा कायम राहावा यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: The pace of installation of IIM-Nagpur Board of Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.