कोराडी-खापरखेडा वीज केंद्रात ऑक्सिजन प्लांट व कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:47+5:302021-04-20T04:09:47+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महानिर्मिती अधिकाऱ्यांची पाहणी : आज जिल्हा प्रशासन सादर करणार अहवाल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर ...

Oxygen Plant and Kovid Center at Koradi-Khaparkheda Power Station | कोराडी-खापरखेडा वीज केंद्रात ऑक्सिजन प्लांट व कोविड सेंटर

कोराडी-खापरखेडा वीज केंद्रात ऑक्सिजन प्लांट व कोविड सेंटर

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महानिर्मिती अधिकाऱ्यांची पाहणी :

आज जिल्हा प्रशासन सादर करणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोरोना उद्रेक नियंत्रित करण्यासाठी प्रसंगी महानिर्मितीच्या कोराडी व खापरखेडा विद्युत केंद्रातील ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनची उपलब्धता करता येईल का व त्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी बेडची व्यवस्था करता येईल का, याची तातडीने चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांना दिले आहेत. सोमवारी रात्री जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही केंद्राची पाहणी वरिष्ठस्तरावर करण्यात आली. मंगळवारी सकाळी यासंदर्भातील अहवाल सादर करणार आहे.

नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक प्रचंड वाढला असून, दररोज मृत्यूसंख्येचा आकडा वाढत आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय हॉस्पिटल तसेच कोविड केअर सेंटरमध्ये बेडची उपलब्धता, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबत वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोना लाट कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन व बेडची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी खापरखेडा व कोराडी येथील ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य आहे. मात्र प्रत्यक्ष कृती करताना ही बाब शक्य आहे का? यासंदर्भातील तांत्रिक व प्रशासकीय बाजू तपासण्यासाठी सोमवारी रात्री जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्वतः दोन्ही वीज केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, उपमुख्य अभियंता शरद भगत, कोराडी येथील मुख्य अभियंता राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर होते. मंगळवारी सकाळी या शक्यतेसंदर्भात पालकमंत्र्यांमार्फत राज्य शासनाला अहवाल दिला जाणार आहे.

सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री नितीन राऊत व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत ऑक्सिजन प्लांटच्यासंदर्भात नागपूरजवळील वीजनिर्मिती केंद्र पर्याय होऊ शकतात का? याची विचारणा केली. वीज केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणासाठी ओझोन प्लांटची आवश्यकता असते. या ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनची उपलब्धता शक्य आहे. सोबतच वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात शहरात रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यास ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी जवळच अर्थात या दोन्ही केंद्रांमध्ये तात्पुरती कोविड केंद्रे उभारली जाऊ शकतात काय? याबद्दलचीदेखील चाचपणी करण्याचे त्यांनी सांगितले आहे. कोराडी वीजनिर्मिती केंद्रात ३९० क्युबिक मीटर प्रति तास क्षमतेचा ओझोन प्लांट कार्यरत आहे तर, खापरखेडा येथे ५० क्युबिक मीटर प्रति तास क्षमतेचा ओझोन प्लांट कार्यरत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची उपलब्धता या ठिकाणी शक्य असून, उद्या सकाळी जिल्हा प्रशासन यासंदर्भात आपला अहवाल पालकमंत्र्यांना देणार आहे.

Web Title: Oxygen Plant and Kovid Center at Koradi-Khaparkheda Power Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.