एक लाखाहून अधिक भूखंड नियमित
By Admin | Updated: March 16, 2017 02:21 IST2017-03-16T02:21:37+5:302017-03-16T02:21:37+5:30
नागपूर सुधार प्रन्यासकडे (नासुप्र) नियमितीकरणासाठी १ लाख ५८ हजार ९३४ भूखंडधारकांनी अर्ज केले होते.

एक लाखाहून अधिक भूखंड नियमित
नासुप्रची मोहीम यशस्वी : भूखंडधारकांना दिलासा
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासकडे (नासुप्र) नियमितीकरणासाठी १ लाख ५८ हजार ९३४ भूखंडधारकांनी अर्ज केले होते. यातील १ लाख २३ हजार ३७२ लोकांना मागणीपत्र पाठविण्यात आले होते. ज्यांनी विक्रीपत्र सादर केले. भूखंड वादग्रस्त नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे, असे १ लाख ३ हजार ५७५ भूखंड नियमित करण्यात आले आहे.
गुंठेवारी अधिनियम २००७ अनधिकृत अभिन्यासांतर्गत येत असलेल्या १९०० व ५७२ ले-आऊ टमधील भूखंडांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. नासुप्रने भूखंड नियमितीकरणाची मोहीम राबविल्याने नियमितीकरणाला गती मिळाली. यामुळे शहरातील लाखो भूखंडधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नासुप्र संदर्भात सर्वसामान्यात वर्षभरापूर्वी चांगली प्रतिक्रिया नव्हती. कामासाठी चकरा माराव्या लागतात, अशा लोकांच्या तक्रारी असायच्या. परंतु अभिन्यास नियमितीकरणाला लागणारा विलंब विचारात घेता, सभापती दीपक म्हैसेकर यांनी जाचक नियमात शिथिलता आणली. फाईल्सचा तातडीने निपटारा होण्यासाठी प्रशासकीय सुधारणा केल्या. प्रकल्प विभागाची व सामान्य प्रशासन विभागाची स्थापना, नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द, नासुप्रद्वारे वेगळी नामांतर प्रकिया बंद व शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने कामकाजात गती आली. त्यामुळेच लाखाहून अधिक भूखंड नियमित करण्याला यश मिळाले.
नागपूर शहरात भूखंड नियमितीकरणाची प्रक्रिया महापालिका व नासुप्र यांच्या स्तरावर राबविली जाते. परंतु भूखंडाच्या नियमितीकरणासाठी महापालिका व नासुप्र यांच्या शुल्क आकारणीत मोठी तफावत होती. नासुप्रकडून अधिक शुल्क आकारले जात होते. जाचक शुल्क आकारणीमुळे नियमितीकरणाला भूखंडधारकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे नियमितीकरणासाठी सरसकट ५६ रुपये प्रतिचौरस फूट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे नियमितीकरणाला गती मिळाली. (प्रतिनिधी)