कोरोनाच्या सावटात गेल्या वर्षभरात आठ लाखांवर वीज जोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:41+5:302021-04-04T04:08:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण काळातदेखील महावितरणतर्फे गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील तब्बल ८ लाख २ हजार ...

कोरोनाच्या सावटात गेल्या वर्षभरात आठ लाखांवर वीज जोडण्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण काळातदेखील महावितरणतर्फे गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील तब्बल ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीज जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक २ लाख ८५ हजारावर वीज जोडण्या कोकण विभागात देण्यात आल्या आहेत.
महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार साधारणतः ९ ते १० लाख नवीन वीज जोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीज जोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. तरीही इतर वीजसेवांप्रमाणेच नवीन वीज जोडणी देण्याच्या कामात कोणताही खंड पडला नाही. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील ८,०२,७८२ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वीज मीटरचा तुटवडा कमी करण्यासाठी महावितरणकडून सिंगल फेजचे १८ लाख व थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीज मीटरचा पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादारांना याआधीच देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे महावितरणच्या चारही प्रादेशिक कार्यालयांना मार्च अखेरपर्यंत ३ लाख ३५ हजार नवीन वीज मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. येत्या एप्रिल महिन्यातदेखील सुमारे साडेतीन लाखांवर नवीन वीज मीटर पुरविण्याचे नियोजन आहे. ग्राहकांना खुल्या बाजारातून नवीन वीज मीटर खरेदी करण्याची आता आवश्यकता नाही, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर वर्गवारीतील ६ लाख २७ हजार ५२९ वीज ग्राहकांना एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत तर १ लाख ८२ हजार ५४१ नवीन वीज जोडण्या जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्याच्या कालावधीत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
चौकट
विभागनिहाय वीज जोडण्या
विभाग वीज जोडण्या
कोकण २,८५,३३२
पुणे २,२८,६९३
नागपूर १,६५,१८१
औरंगाबाद १,२३,५७१