खडतर परिस्थितीवर प्रेरणाची मात
By Admin | Updated: May 28, 2015 02:35 IST2015-05-28T02:35:46+5:302015-05-28T02:35:46+5:30
वडील सायकल रिक्षाचालक, त्यातही व्यसन असल्याने आर्थिक परिस्थिती खडतरच. दोनवेळचे पोट भरले की दिवस सार्थकी लागला, अशी घरची अवस्था.

खडतर परिस्थितीवर प्रेरणाची मात
नागपूर : वडील सायकल रिक्षाचालक, त्यातही व्यसन असल्याने आर्थिक परिस्थिती खडतरच. दोनवेळचे पोट भरले की दिवस सार्थकी लागला, अशी घरची अवस्था. मात्र आईने दिलेल्या पाठबळामुळे प्रेरणाने जिद्दीने अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ८० टक्के गुण मिळविले. तिचे हे यश सर्व सोयीसुविधा मिळवून गुणवंतांच्या यादीत आलेल्या मुलांपेक्षा कितीतरी मोठे आहे.
प्रेरणा मनोहर डांगे ही दयानंद आर्य कन्या, ज्युनि. कॉलेजची विद्यार्थिनी आहे. घरात आई, वडील व एक मोठी बहीण आहे. घरच्या परिस्थितीमुळे ट्युशन तर सोडाच शिक्षणाचे साहित्यही तिला पुरेसे मिळाले नाही. कॉलेजला ती नियमित जायची. शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासाची घरी उजळणी करायची.
घरकामात आईलाही हातभार लावायची. वडिलांच्या व्यसनामुळे घरातील वातावरण नेहमीच तणावाचे राहायचे. अशातही तिने अभ्यासात खंड पडू दिला नाही.
कुठल्याही गोष्टीची आईपुढे कुरबूर केली नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर कुणालाही कौतुक वाटेल असे यश तिने मिळविले आहे. आईच्या पाठबळामुळेच यश संपादन केल्याची भावना तिने व्यक्त केली. पुढे मेडिकलला जाण्याची तिची इच्छा आहे. (प्रतिनिधी)