सावनेर, कळमेश्वर येथील रुग्णवाढ चिंताजनक : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 00:42 IST2021-02-23T00:37:48+5:302021-02-23T00:42:22+5:30
Corona Outbreak at Savner, Kalmeshwar, जिल्ह्यातील सावनेर व कळमेश्वर या जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितांचा आकडा वाढतो आहे. नागपूर ग्रामीणनंतर सावनेर तालुक्याचा कोरोनावृध्दीमध्ये दुसरा क्रमांक आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून तो आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

सावनेर, कळमेश्वर येथील रुग्णवाढ चिंताजनक : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सावनेर व कळमेश्वर या जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितांचा आकडा वाढतो आहे. नागपूर ग्रामीणनंतर सावनेर तालुक्याचा कोरोनावृध्दीमध्ये दुसरा क्रमांक आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून तो आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील ‘कोरोना’ स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी जि.प.उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते. तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यानंतर ‘कोरोना’ उपाययोजनेसंदर्भातील अधिकारी व ‘कॉंटॅक्ट ट्रेसर्स’ची बैठक घेण्यात आली.
ग्रामीण भागात ‘मायक्रो कन्टेन्मेन्ट झोन’ स्थापन करण्यात येणार आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी जनमानसात संपर्क साधून लोकांना सर्दी, खोकला असल्यास तपासणी करण्यास सांगावे. त्याचे समुपदेशन करावे. ‘कॉंटॅक्ट ट्रेसिंग’साठी दूध, भाजीपाला दुकान, सलून यांच्या याद्या मालक, नोकर,त्यांच्या संपर्कातील सर्व सदस्यांसहीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोरोना बाधितांनी घरातच राहावे. रुग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक रुग्णामागे २० जणांचे ‘ट्रेसिंग’ आवश्यक
‘कॉन्टॅक्ट ट्रेसर्स’नी तालुक्यात १४ पथके करावीत. त्यांनी सकाळी ८ ते २ व दुपारी २ ते १० पर्यंत दोन भागात विभागणी करुन या कामास गती द्यावी. या पथकांमध्ये मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, इंजिनिअर यांचा समावेश आहे. प्रत्येक रुग्णामागे २० लोकांचे ‘ट्रेसिंग’ करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ‘ट्रेसिंग’चे प्रमाण सावनेरमध्ये अल्प असल्याने कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.